मंत्री दिगंबर कामत यांच्या वक्तव्याने गोव्यात खळबळ
पणजी : गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांच्या वाढदिवस कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी केलेल्या निवेदनानंतर गोव्यात खळबळ माजली आहे. पुढील 15 वर्षात भाजप गोव्यात कधीच जिंकणार नाही आणि दामू नाईक यांनी तसे वातावरण तयार करावे, असे निवेदन कामत यांनी केल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला आणि त्यावर खमंग चर्चा तसेच टिकाटिपणी करण्यात आली.
याबाबत खुलासा करताना कामत म्हणाले की हे निवेदन (व्हिडिओ) आपली बदनामी करण्यासाठी कोणीतरी केले असून तो व्हिडिओ मुद्दाम प्रसारित केला जात आहे. आपण सत्याने पुढे जाणारा माणूस असून त्या बदनामीतून काहीच निष्पन्न होणार नाही. देव आपल्या पाठिशी आहे. जे कोणी हा बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करीत आहेत त्यांना देव बघून घेईल. आपण तसे काही बोललेलो नाही. आपल्या तोंडी ते निवेदन घालण्यात आले असून कोणीतरी बनावट व्हिडिओ केला असल्याचे कामत म्हणाले.
त्या वाढदिवस कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच खुद्द नाईकही उपस्थित होते.शिवाय काही मंत्री आमदार तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन केल्याचे व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर उपस्थितीत असलेले मुख्यमंत्री, अन्य पदाधिकारी टाळ्या वाजवत असल्याचेही दिसत आहे.