खाण व्यवसाय ऑक्टोबरपासून
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा अंदाज : 29 सप्टेंबर रोजी आणखी लिलाव,2.9 दशलक्ष टन खनिजाचा समावेश
पणजी : राज्यातील खाण व्यवसाय येत्या 1 ऑक्टोबरच्या दरम्यान सुऊ होईल, असा अंदाज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत जीएसटीच्या बैठकीनंतर गोव्यात परतण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, अलिकडेच आम्ही तीन खाणींचा लिलाव पुकारला. यापूर्वी ज्यांना खाणींचे परवाने मंजूर झालेले आहेत अशी मंडळी येत्या दि. 1 ऑक्टोबरपासून खाणी सुरू कऊ शकतात. अनेक कंपन्यांनी लिलावांद्वारे गोव्यातील खाणी घेतलेल्या आहेत. त्यामुळे काही कंपन्या 1 ऑक्टोबरपासून खाणी सुरू करतील. इतर काही कंपन्या नंतर खाणी सुरू करतील. खाणी सुऊ झाल्यानंतर हजारो व्यक्तींना रोजगार प्राप्त होईल.
2.9 दशलक्ष टन खनिजासाठी लिलाव
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अलिकडेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आता 29 सप्टेंबर रोजी 2.9 दशलक्ष खनिजमाल व डंपिंगसाठी लिलाव पुकारला जाईल. मागील वेळी काहींनी लिलावमध्ये माल उचलण्यासाठीचे अधिकार प्राप्त केले, मात्र काहींनी माल उचलला नाही, तो माल सरकारकडे राहिला. आता तर खाणींवर काढून ठेवलेला खनिजमाल आणि त्या पलिकडे काढून ठेवलेल्या डंप्स्चा मालकीहक्क गोवा सरकारचा झालेला आहे.
न्यायालयाच्या निवाड्याचा लाभ
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निवाड्यानुसार गोवा सरकारला त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. गोवा सरकार येत्या 29 सप्टेंबर रोजी लिलाव पुकारणार असून सुमारे 2.9 दशलक्ष टन खनिजमालाच्या विक्रीसाठी लिलाव होईल. यानंतर खनिजमालाची विक्री केल्यानंतर सर्व पैसा हा गोवा सरकारचा राहील. खाणीद्वारे रोजगारसंधी प्राप्त होईल. अनेक ट्रकचालकांना पुन्हा एकदा संधी प्राप्त होईल. पुन्हा एकदा गोव्यात खाण व्यवसाय तेजीत सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.