अमेझॉन नदीत सोडण्यात आले लाखो कासव
ब्राझीलच्या विशाल अमेझॉन जंगलादरम्यान अबुफारी बायोलॉजिकल रिझर्व्ह नावाचे खास ठिकाण आहे. हे अमेजनास प्रांताच्या तापाउआ शहरानजीक आहे. येथे दरवर्षी जगातील सर्वात मोठ्या आकाराचे गोड्या पाण्यातील कासव पोडोस्नेमिस एक्सपैंसा अंडी देण्यासाठी येत असतात. स्थानिक लोक त्यांना प्रेमाने तार्तारुगा दा अमेजोनिया किंवा जायंट रिव्हर टर्टल म्हणतात मादी कासवाच्या कवचाचा आकार 80-100 सेंटीमीटर लांब असतो. तर वजन 70-90 किलोपर्यंत असते. नर कासव काहीसा छोटा असतो. मादी कासव एकावेळी 70-150 अंडी देत असते. हे कासव 100 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात.
50-60 वर्षांपूर्वी लोक या कासवांची अंडी आणि मांसासाठी मोठ्या प्रमाणात शिकार करत होते. नदीकाठावर अंडी देण्याच्या हंगामात लोक रात्री यायचे आणि सर्व अंडी खोदून न्यायचे. यामुळे 1980 पर्यंत हे कासव जवळपास विलुप्त होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मादी कासव वाळूच्या उंच किनाऱ्यांवर येतात अन् अंडी देतात. चिको मेंडेस इन्स्टीट्यूटचे कर्मचारी आणि स्थानिक नदीकाठावर लोक रात्रंदिवस पहारा देतात. या अंड्यांना अत्यंत काळजीपूर्वक खोदून सुरक्षित हॅचरीमध्ये नेण्यात येते.
तेथे नैसर्गिक बीचप्रमाणे वाळू आणि तापमान राखले जाते. 45-60 दिवसांनी चिमुकले कासव अंड्यांमधून बाहेर पडतात. ही पिर्ल्ल पूर्णपणे चालण्या-फिरण्यास योग्य झाल्यावर त्यांना नदीत सोडण्यात येते. यावर्षी 1 लाखाहून अधिक अंडी वाचविण्यात आली. 80 हजारांहून अधिक पिल्लांना यशस्वीपणे सोडण्यात आले. 30 वर्षांपासून चाललेल्या या प्रकल्पामुळे आता या प्रजातीला ‘धोक्या’च्या यादीतून हटवत ‘कमी चिंतायुक्त’ श्रेणीत सामील केले जाईल. येथे 50 किलोमीटर लांब वाळूचा किनारा असून जो दरवर्षी पूरानंतर साफ होतो. यामुळे कासवांसाठी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. हा पूर्ण भाग संरक्षित क्षेत्र असून येथे कुठलीही मानवी वस्ती किंवा शिकारची अनुमती नाही. येथे मासे,
डॉल्फिन आणि कासव सर्व एकत्रित सुरक्षित राहतात. पूर्वी लोक शिकार करायचे. तर आता लोक रक्षक ठरले आहेत. सरकार या लोकांना नोकरी आणि प्रशिक्षण देते. मुले शाळांमध्ये कासवांविषयी शिकतात आणि आपल्याकडील नदीत जगातील सर्वात मोठा कासव राहतो याचा त्यांना अभिमान आहे. अमेझॉन नदीत सूर्यास्त होताना शेकडो पिल्लांना पाण्याच्या दिशेने धावताना पाहिल्यावर निसर्गाला वाचविणे अवघड नसल्याचे वाटू लागते.