दूध वाढविणारी ‘चिप’
आज जगात अद्भूत आणि आश्चर्यकारक वाटतील असे शोध लागण्याच्या युगाचा प्रारंभ झाला आहे. जगात माणसांची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. त्यामुळे इतक्या माणसांना पोसायचे कसे, हा प्रश्न अनेक देशांना पडला आहे. यासंदर्भात नवी संशोधने होत आहेत. गाई, म्हशी इत्यादी प्राण्यांचे दूध हे माणसाचे अन्न म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. तथापि, या प्राण्यांची संख्या किती असावी आणि त्यांनी किती दूध द्यावे, यालाही काही मर्यादा आहे. त्यामुळे या प्राण्यांच्या दुधात वाढ कशी होईल, यावर अनेक देशांमध्ये मोठे संशोधन होत आहे.
रशियन संशोधकांनी अशी एक मायक्रोचिप शोधल्याचे प्रतिपादन केले आहे, की जी गाईच्या मेंदूत बसविली, तर तिच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. सध्या यासंबंधात बरेच प्रयोग केले जात आहेत. ते यशस्वी झाल्यास जगाचा दुधाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही चिप बसविण्याच्या प्रक्रियेला ‘न्यूरो इम्प्लांट’ असे संबोधले जाते. रशियाच्या ‘नेअरी’ या कंपनीने शस्त्रक्रिया करुन ही चिप गाईच्या मेंदूत बसविण्यात यश मिळविले आहे. गाईच्या मेंदूत भूक, प्रजजन आणि ताण यांच्यावर नियंत्रण ठेवणारी काही केंद्रे असतात. ही चिप या केंद्रांना विजेचे सौम्य झटके देते. त्यायोगे या केंद्रांची कार्यक्षमता वाढते आणि गाय अधिक दूध देण्यास उद्युक्त होते. अर्थातच, यासाठी गाईला अधिक खाद्यही द्यावे लागते. पण दुधाचे उत्पादन वाढल्याने माणसाच्या अन्नाची सुलभरित्या सोय होऊ शकते. या चिपचा गाईच्या प्रकृतीवर किंवा मनावर काही लक्षणीय वाईट परिणाम होत नाही, असेही आढळल्याचे प्रतिपादन केले जाते. त्यामुळे हे संशोधन सुरक्षित असून त्यामुळे जगाचा दुधाचा प्रश्न सुटेल, अशी आशा संशोधकांना वाटते. मात्र, असेक संशोधकांचा आणि प्राणीप्रेमींचा या प्रयोगांना विरोध आहे. पाण्यांचा उपयोग यंत्राप्रमाणे माणसाचा हव्यास भागविण्यासाठी करणे हे मानवता आणि शास्त्र या दोन्ही दृष्टींनी अयोग्य आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे भविष्यकाळात यावरुन नैतिकतेच्या संदर्भात वाद निर्माण होणे शक्य आहे. जिवंत प्राण्यांवर असे प्रयोग करुन त्यांची नैसर्गिक जीवनशैली उध्वस्त करु नये, असे मत आग्रहाने मांडले जात आहे. या प्रयोगासंबंधीही हेच होत आहे.