शिरसी, सिद्धापूर, कुमठा, यल्लापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
सोशल मीडियावर भूकंप झाल्याचे वृत्त व्हायरल : भूकंप मापन केंद्राकडून इन्कार
कारवार : एकीकडे कारवार जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे सावट असताना दुसरीकडे जिल्ह्यातील शिरसी, सिद्दापूर, कुमठा आणि यल्लापूर तालुक्यातील कांही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हे धक्के आज रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के सुमारे तीन सेकंद टिकून होते, असे सांगण्यात आले. हिंद महासागरात झालेल्या भूकंपाचे परिणाम कारवार जिल्ह्यातील घाट प्रदेशात झाले असावेत, असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. यल्लापूर आणि कुमठा तालुक्यातील कांहीअंशी शिरसी तालुक्यातील होसळळी, कसगे, बंडळ, संपखंड, गोळीमक्की, मत्तीपट्टा परीसर तर सिद्धापूर तालुक्यातील हेग्गरणी, हेरूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले. भूकंपामुळे घरामधील सोफा, खुर्च्या काही काळ हलल्या, पत्र्यांच्या घरामध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना तर भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. भूकंपाची जाणीव होताच कांही नागरिक घराबाहेर पडले. रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळीला फोन करून आपणाला आलेला अनुभव इतरांनाही आला काय याची विचारणा केली.
मच्छीमारी बांधवांना समुद्रात न जाण्याचा इशारा
सौम्य धक्क्यामुळे भूकंपग्रस्त प्रदेशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे प्रमाण रिश्टर स्केलमध्ये किती होते, हे समजू शकले नाही. भूकंप मापन केंद्राकडून भूकंपाच्या व़ृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. जिल्ह्यात विशेष करून मलनाड प्रदेशात अवकाळी पावसाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी हवालदिल झाला आहे. मच्छीमारी बांधवांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भूकंप झाला नसून नागरिकांनी भीती बाळगू नये
जिल्ह्यात कुठेही भूकंपाची नोंद झालेली नाही, अशी माहिती कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिरसी, यल्लापूर आणि सिद्धापूर तालुक्यातील घाट प्रदेशात भूकंप जाणवल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबद्दल स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, भूकंपाबद्दल कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राला संपर्क साधून विचारणा केली असता अशाप्रकारच्या मॅसेजची रिश्टर मापन केंद्रावर नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यास जिल्हावासियांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी (08382229857) संपर्क साधावा.
- जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया