मिहीर पोतदार यांची चीफ पेट्रॉनपदी निवड
बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडीबिल्डिंग अॅण्ड स्पोर्ट्स असोसिएशन
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडीबिल्डिंग अॅण्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या जिल्हा संघटनेचे चीफ पेट्रॉन म्हणून बेळगावचे युवा उद्योजक व क्रीडाप्रेमी मिहीर अनिल पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावातील सुवर्ण कारागीर क्षेत्रात ठसा उमटविलेले अनिल पोतदार यांचे ज्येष्ठ चिरंजीव मिहीर पोतदार यांची क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी झाली आहे. सेंट पॉल्स स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन ते महाविद्यालयीन शिक्षण आरएलएसमधून तर भरतेश महाविद्यालयातून बीबीए शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन एमबीए ही पदवी मिळविली. मिहीर लहानपणापासूनच खेळात विशेष रस असल्याने शालेय व महाविद्यालयीन कालावधीत त्याने क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. आपल्या संघाला सामने त्यांनी जिंकून देण्यास सिंहाचा वाटा उचलला होता. क्रिकेटबरोबर त्याने जलतरणातही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
त्याचे वडील अनिल पोतदार हे सामाजिक बांधिलकी सांभाळतानाही क्रीडा क्षेत्राची आवड आहे. बेळगावच्या एमएलआयआरसी च्या गोल्फ मैदानावर त्यांनी एमएलआयआर चषक पटकाविला. त्याचप्रमाणे त्यांनी इतर राज्यातही गोल्फ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मिहीरने गोल्फ क्षेत्रात प्रवेश करत या क्रीडा प्रकाराचा नियमीत सराव केला आणि तो या क्षेत्रात एक अव्वल गोल्फपटू म्हणून ओळखला जातो. मिहीरने विविध ठिकाणांच्या गोल्फ स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या एमएलआयआरसी चषक गोल्फ स्पर्धेत त्याने अजिंक्यपद पटकाविले. त्याचप्रमाणे मराठा चषक, इन्फंट्री चषक, पॅट्रॉन चषकावर त्यांनी नाव कोरले आहे. इतर खेळांप्रमाणेच मिहीरला व्यायामाची आवड असून आहे. आपल्या घरातच तो व्यायामाचा सराव करतो.
मिहीरला मर्दानी खेळाची ओढ असल्याने तो शरीरसौष्ठव क्रीडा प्रकाराकडे वळला. व्यायाम करत असताना त्याच्या संपर्कात कांही होतकरू व्यायामपटू आले. त्यांना स्पर्धांमधून भाग घेण्याची प्रबळ इच्छा होती. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास अडथळे निर्माण होत होते. अशा काही व्यायामपटूंना मिहीर यांनी मैत्रीबरोबरच आर्थिक मदतीचाही हात पुढे केला. त्याच्याकडून मिळालेल्या पाठबळामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात ते व्यायामपटू चमकदार कामगिरी करू शकतील असा विचार समोर ठेवून त्याने सढळ हस्ते आर्थिक मदत केली आहे.
बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन अॅण्ड स्पोर्ट्स या संघटनेला हाताशी धरून शरीरसौष्ठवपटूंना पुढे आणण्यासाठी ‘जय गणेश श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी करून दाखविली. ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकरी घरातील व्यायामपटूंना व्यायामाची आवड असणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना बेळगाव डिस्ट्रिक बॉडीबिल्डर्स असोसिएशन अॅण्ड स्पोर्ट्स या संघटनेच्या मागे खंबीरपणे उभे राहून बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंना उच्च स्तरावरती नेण्याचे ध्येय बाळगले. चीफ पेट्रॉनपद पदभार सांभाळत जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले. बेळगाव डिस्ट्रिक बॉडीबिल्डर्स असोसिएशन अॅण्ड स्पोर्टस संघटनेकडून पुढील काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरविल्या जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या जय गणेश श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्याचे अध्यक्ष डॉ. संजय सुंठकर व इतर सभासदांच्या हस्ते मिहीरचा पोतदारचा सत्कार करण्यात आला.