डोक्यात `टॉमी`ने प्रहार करत परप्रांतीय कामगाराकडून चुलत भावाचा खून
देवगड येथील चिरेखाणीवर घडली घटना ; संशयित ताब्यात
देवगड / प्रतिनिधी
सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही, या शुल्लक कारणावरून परप्रांतीय कामगाराने आपल्या चुलत भावाच्या डोक्यात ट्रकच्या `टॉमी`ने प्रहार करत त्याचा निर्घृण खून केला. देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक एका चिरेखाणीवर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव (20, मूळ रा. मध्यप्रदेश) असे असून संशयित रितिक दिनेश यादव (20, रा. मध्यप्रदेश) याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे देवगड तालुका हादरला आहे. दरम्यान, सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच देवगड पोलिसांना सखोल तपासाबाबत मार्गदर्शन केले. या घटनेचा तपास देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.