मायटी मराठाज, राजपुताना रॉयल्स, छोला चीफ्स विजयी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथील यमुना क्रीडा संकुलात पहिल्यांदाच सुरू झालेल्या प्रिमीयर लीग तिरंदाजी स्पर्धेत पावसाच्या किरकोळ अडथळ्यानंतर राऊंडरॉबीन फेरीतील विविध सामन्यांत मायटी मराठाज, राजपुताना रॉयल्स आणि छोला चीफ्स यांनी शानदार विजय नोंदविले.
गुरूवारी सायंकाळी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला चित्रपट क्षेत्रातील सुपर स्टार राम चरण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. या लीगमध्ये फ्रांचायझींचा समावेश झाला आहे. पृथ्वीराज योद्धाज या संघांचे सहमालक चित्रपट अभिनेता रणदीप हुडा तसेच विविध संघांचे फ्रांचायझी उपस्थित होते.
या स्पर्धेतील प्रत्येक संघामध्ये चार सदस्यांचा समावेश असून त्यापैकी दोन पुरूष आणि दोन महिला तिरंदाजपटू आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात छोला चीफ्सने चेरो आर्चर्सचा 5-1 अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मायटी मराठाजने काकतीया नाईट्स संघाचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. या लढतीत मराठाजने 3 सेट्स 73-66, 77-72, 78-71 असे जिंकले. पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यात राजपुताना रॉयल्सने पृथ्वीराज योद्धाज संघावर 6-0 अशी एकतर्फी मात केली. राजपुतानाने हा सामना 75-72, 74-72, 77-74 अशा सेट्समध्ये जिंकला.