मायटी मराठाज, राजपुताना उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या पहिल्या प्रिमीयर लीग तिरंदाजी स्पर्धेत मायटी मराठाज आणि राजपुताना रॉयल्स यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मायटी मराठाजने चोला चेफ्सचा 5-1 असा पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात राजपुताना रॉयल्सला पृथ्वीराज योद्धाजने 0-6 असे पराभूत करुनही राजपुताना रॉयल्सने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. कारण आतापर्यंत राजपुताना रॉयल्सने सलग सात सामने जिंकल्यानंतर त्यांचा हा पहिला पराभव आहे.
मायटी मराठाज आणि चोला चीफ्स यांच्यातील लढतीमध्ये मायटी मराठाजतर्फे परणीत कौर तर चोला चीफ्सतर्फे ब्रॅडी इलिसन यांची कामगिरी दर्जेदार झाली असून त्यांनी पहिल्या सेटमध्ये 10 अॅरोजची नोंद केली. पण त्यानंतर मायटी मराठा संघातील धीरज बोम्मदेवराने 10 अॅरोज नोंदविले. त्यामुळे उभय संघातील पहिला सेट 76-76 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना यावेळी प्रत्येकी 1 गुण मिळाला. दुसऱ्या सेटमध्ये चोला चीफ्सने दर्जेदार कामगिरी करत मायटी मराठाजवर चांगलेच दडपण आणले. पण हा दुसरा सेट मायटी मराठाजने 78-76 असा जिंकत 3-1 अशी दोन गुणांची आघाडी मिळविली.