मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांच्या वेतनात 63 टक्के वाढ
बाजारमूल्यात तिसरी मोठी कंपनी : 665 कोटी आर्थिक वर्षात मिळणार : सुंदर पिचाई घेतात सर्वाधिक वेतन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांच्या वेतन पॅकेजमध्ये 63 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती आहे. पण तरीदेखील आजही जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत सुंदर पिचाई हेच सर्वाधिक वेतन घेण्यात आघाडीवर आहेत.
जगातील तिसऱ्या नंबरची मोठी मूल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टचे मूळचे भारतीय सीईओ सत्या नडेला यांच्या वेतनात 63 टक्के इतकी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्यांना 7.91 कोटी डॉलर म्हणजेच 665 कोटी रुपये वेतनाखातर मिळणार आहेत, असे समजते. मायक्रोसॉफ्टचा समभाग यंदा चांगलाच तेजीत होता. यासोबत कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 3 ट्रिलियन डॉलरच्या वर पोहचले आहे. जगातील तीन कंपन्या अशा आहेत ज्यांचे बाजार भांडवल मूल्य 3 ट्रिलियन इतके आहे. मायक्रोसॉफ्टच्या व्यतिरीक्त अॅपल आणि एनव्हिडीया या दोन कंपन्या यांचे बाजारमूल्य तितके आहे. 30 जून 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात मायक्रोसॉफ्टचे समभाग 31 टक्के इतके तेजीत राहिले आहेत. नडेला यांना मागच्या वर्षी 48.5 दशलक्ष डॉलरचे वेतन पॅकेज मिळाले होते. यावर्षी त्यांना 71 दशलक्ष डॉलर मिळणार आहेत. 1992 मध्ये नडेला हे मायक्रोसॉफ्टमध्ये सामील झाले आहेत आणि तेव्हापासून ते कंपनीत कायम आहेत. 2014 मध्ये त्यांना कंपनीने सीईओ बनवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तंत्रज्ञान कल्पकतेत कमालीची भरारी घेतली.
सुंदर पिचाईंना सर्वाधिक वेतन
पण तसं पाहायला गेल्यास सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्यांच्या यादीत भारतीय मूळचे सीईओ गुगलची सहकारी कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई हे प्रथम स्थानावर आहेत. अल्फाबेटचे बाजार भांडवल मूल्य 2 ट्रिलियन डॉलर इतके आहे. ही जगातील चौथी मोठी मूल्याची कंपनी आहे. पिचाई यांना 2022 मध्ये 22.59 कोटी डॉलरचे पॅकेज मिळाले होते, जे भारतीय रुपयात पाहता 1900 कोटी रुपये इतके येते. या यादीत अॅडोबचे सीईओ शंतनू नारायण आहेत, ज्यांना वर्षाला वेतन पॅकेज रुपात 300 कोटी रुपये मिळतात.