म्हादईप्रश्नी सुनावणी दुसऱ्या दिवशीही नाहीच
पणजी/ खास प्रतिनिधी
म्हादई नदीच्या पाण्याच्या वाटपावर आयोगाने दिलेल्या निवाड्यास गोव्याने दिलेल्या आव्हान अर्जावर सर्वोच्च न्यायालयात काल गुऊवारी याचिका सुनावणीस येईल अशी शक्यता असताना ती आलीच नसल्याने गोमंतकीयांच्या नशिबी निराशाच आली. सदर सुनावणी आता पुढील बुधवारी- गुऊवारी होणार असल्याचे गोव्याचे एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले. म्हादईप्रश्नी बुधवारी 29 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती पण, त्यादिवशी याचिका सुनावणीस आलीच नाही. त्यामुळे निदान गुऊवारी याचिका सुनावणीस येईल अशी आशा होती, पण ती फोल ठरली.
विजय सरदेसाई यांच्याकडून टीका
म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दोन दिवस सुनावणी झालीच नसल्याने गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. ट्विट करून त्यांनी सरकारला सवाल केला की, म्हादईबाबत आम्ही गंभीर आहोत की सुशेगाद? सुनावणी बुधवारी होणार होती मात्र ती सुनावणी झालीच नाही. गुरुवारीही याचिका सुनावणीस आली नाही, यामुळे गोव्याला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. म्हादईप्रकरणी गोवा सरकारच्या अनास्थेमुळे आपणास धक्का बसला आहे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारची रणनीती नाही, कोणतेही पर्याय नाहीत किंवा पुढे कसे जायचे याची कोणतीही माहीती नाही, आता हे स्पष्ट व्हायला लागले आहे. जलसंपदा मंत्र्यांना म्हादईबाबत रणनीती ठरवण्यासाठी सभागृह समितीची बैठक बोलावण्याची विनंती केली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही.भाजप सरकारची म्हादईबाबत अनास्था कर्नाटकशी स्थानिक पक्षाच्या संगनमताचा आणखी एक दाखला म्हणून गोमंतकीयांनी घ्यावी का? असा तिखट प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.