मेवातची कहाणी
हरियाणातील नूंह हा भाग लोकसभा निवडणुकीमुळे तेथील राजकीय समीकरणांमुळे चर्चेत आला आहे. हा भाग मुस्लीमबहुल आहे. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात मागील वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस शोभायात्रेवर दगडफेक अन् गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने तेथे सांप्रदायिक रुप धारण केले होते. तेथील हिंसेत एकूण 6 जणांना जीव गमवावा लागला होता. तसेच मोठ्या प्रमाणात जाळपोळ अन् तोडफोड झाली होती. नूंह येथील या घटनेला शतकांपूर्वीचा इतिहास कारणीभूत आहे. शतकांपूर्वीच्या या कहाणीनेच मेवातला सांप्रदायिक राजकारणाच्या प्रयोगशाळेत बदलून टाकले आहे. बाबरपासून सुरू झालेल्या या कहाणीचा भारत-पाकिस्तान फाळणी आणि महात्मा गांधींशी कनेक्शन आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मेवातला सांप्रदायिक राजकारणाच्या आखाड्यात बदलून टाकले आहे.
फाळणीशी आहे कनेक्शन
1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर नोआखली येथील दंगली शांत केल्यानंतर महात्मा गांधी हे मेवात येथील घसेरा गावात पोहोचले होते. त्यांनी मेवात येथे राहणाऱ्या मुस्लीम समुदायाच्या मेव लोकांना पाकिस्तानात न जाण्याचे आवाहन केले होते. भारत हीच तुमची भूमी असून हाच तुमचा देश असल्याचे गांधींनी त्यांना उद्देशून म्हटले होते. मेव मुस्लिमांनी महात्मा गांधी यांचे म्हणणे मान्य करत पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला होता. मेव मुस्लीम 12 व्या शतकापासून भारतात राहत आहेत.
काय आहे मेवातची कहाणी?
बाबरने जेव्हा महाराणा सांगासोबत खानवाचे युद्ध केले होते, तेव्हा मेवातचे नवाब हसन खान होते. मेवातचा अर्थ मेव असा आहे. मेव हे मुस्लीम असले तरीही ते मुस्लिमांपेक्षा वेगळे आहेत. एकप्रकारे त्यांचा धर्म मुस्लीम असला तरीही पद्धती हिंदूंसारख्या आहेत. मेव मुस्लीम निकाह देखील करतात आणि विवाह देखील. तसेच ते ईद साजरी करतात आणि होळी आणि दिवाळी देखील.
मेवातचा विस्तार
1988 मध्ये दिल्लीच्या संगीत नाटक अकॅडमीकडून शैल मायारामचा प्रकाशित पेपर ‘द ओरल ट्रेडिशन ऑफ मेवात’नुसार मेवात सुमारे 7,910 चौरस किलोमीटरचा एक भाग आहे, यात राजस्थानचे काही हिस्से, हरियाणाचे काही हिस्से आणि उत्तरप्रदेशचे काही हिस्से मोडतात. राजस्थानच्या अल्वरमधील तिजारा, अल्वर, लक्ष्मणगण, किशनगढ हे तालुके तर भरतपूर येथील डिग, नागर अणि कामन तालुके मेवातचा हिस्सा आहेत. हरियाणातील गुडगावचे नूंह, फिरोजपूरचे झिरका हे मेवातमध्ये मोडते. तर उत्तरप्रदेशातील छाता तालुका देखील मेवातचाच भाग आहे. हे सर्व भाग मिळून मेवात तयार होतो, येथे राहणारे मुस्लीम स्वत:ला राम, कृष्ण आणि अर्जुनाचे वंशज मानतात.
हिंदू-मुस्लीम एकतेचे उदाहरण
1527 मधील खानवा युद्धादरम्यान मेवातचे नवाब हसन खान मेवाती यांनी महाराणा सांगा विरोधात आपल्याला साथ द्यावी अशी बाबरची इच्छा होती. परंतु हसन खान यांनी महाराणा सांगा यांना साथ दिली होती. या युद्धात बाबरचा विजय झाल्याने त्याने हसन खान याची क्रूरपणे हत्या केली होती. या युद्धाने हिंदू-मुस्लीम एकतेचे उदाहरण प्रस्थापित केले होते. मेव हे स्वत:ला मुस्लीम ठरवत होते, परंतु स्वत:ची जात ते राजपूत सांगत होते. मेव मुस्लीम ईद साजरी करण्यासह रामनवमी आणि कृष्ण जन्माष्टमीही साजरी करायचे.
विविध आंदोलनांमुळे फूट
1920 च्या दशकापर्यंत मेवातमधील हिंदू-मुस्लीम एकतेचे सत्र कायम राहिले होते, परंतु यादरम्यान दोन्ही धर्मांच्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे हा सलोखा कमी झाला आहे. त्यावेळी आगरा अन् मथुरेच्या आसपास राहणाऱ्या पूर्वी मलकाना राजपूत होते आणि ज्यांच्या पूर्वजांनी 100-200 वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता अशा मुस्लिमांच्या घरवापसीची मोहीम सुरू झाली होती. या आंदोलनामुळे मुस्लिमांमध्ये चिंता निर्माण झाली. पश्चिम उत्तरप्रदेशातील मोठे जमीनदार मौलाना शाह इलियास यांनी स्वत:ची सर्व संपत्ती विकून मेवातमध्ये 100 मदरसे निर्माण केले आणि घरवापसी केलेल्या लोकांना पुन्हा इस्लामचे शिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले होते. मौलाना शाह इलियास यांनी तबलिगी जमात सुरू केली, जी लोकांच्या घरोघरी जात त्यांना नमाज पठणासाठी प्रेरित करू लागली. याच्या प्रत्युत्तरादाखल स्वामी दयानंद सरस्वती यांनी शुद्धी आंदोलन सुरू केले. ज्या धार्मिक अधिकाराने मुस्लिमांना तबलीग आणि तंजीमचा हक्क आहे, त्याच अधिकाराद्वारे मला हिरावलेल्या भावांना पुन्हा स्वत:च्या घरांमध्ये परत आणण्याचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हिंसेच्या कहाणीस सुरुवात
या आंदोलनानंतर निर्माण झालेली दरी कधीच भरून काढता आलेली नाही. स्वामी दयानंद सरस्वती हे मलकाना राजपूताची घरवापसी करत त्यांना हिंदू करत होते. तर मौलाना शाह इलियास मेव मुस्लिमांना इस्लामचे शिक्षण देऊन नमाज पठणासाठी प्रेरित करत होते. याचदरम्यान 1929 मध्ये अल्वरचे महाराज जय सिंह यांच्या राज्याभिषेकाची रजत जयंती होती. त्यांनी स्वत:ला राज ऋषी आणि धर्म प्रभाकर घोषित केले होते. त्यांच्या राज्याभिषेकाच्या रजत जयंतीकरता मोठा कार्यक्रम आयोजित झाल्याने पूर्ण खजिना रिकामी झाला होता. यामुळे महाराज जयसिंह यांनी कर प्रमाण चौपट केले होते. या निर्णयाला मेयो मुस्लिमांनी विरोध दर्शविला होता आणि राजाच्या विरोधात झालेल्या या बंडादरम्यान हिंसा झाली होती. या हिंसेत शेकडो मेयो मुस्लीम मारले गेले. हा विरोध चौपट कराच्या विरोधात असला तरीही तेव्हा याला सांप्रदायिक रंग प्राप्त झाला होता. या घटनेला हिंदू राजाच्या विरोधात मुस्लिमांचे बंड म्हणून पाहिले गेले. त्यानंतर पुढील काळात भारताची फाळणी धर्माच्या नावावर झाली. अशा स्थितीत हिंदू आणि मुस्लीम थेट स्वरुपात दोन गटांमध्ये विभागले गेले.
मेव मुस्लिमांची भूमिका
मेवातमधील हिंदूंना भारतात राहायचे होते, तर मुस्लिमांना पाकिस्तानात जायचे होते. पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार झाल्याने मेव मुस्लिमांनाही फटका बसला. त्यांच्या विरोधात हिंसा झाली. या हिंसेमुळे लाखो मेयो मुस्लीम अल्वर आणि भरतपूरच्या पुढील भागात राहू लागले, या भागाला आता गुरुग्राम म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानात जायची इच्छा असलेल्या मेयो मुस्लिमांना महात्मा गांधी यांनी हिंदुस्थान तुमचाही देश असल्याचा भरवसा दिला होता. परंतु काही काळातच महात्मा गांधी यांची हत्या झाल्याने त्यांना भरवसा देणारा कुणी राहिला नाही आणि पाकिस्तानात नेणाराही कुणी उरला नाही. यामुळे त्यांना नाईलाजास्तव भारतातच रहावे लागले. परंतु मेयो मुस्लीम अन् हिंदूंमध्ये परस्परांची साथ असल्याचा विश्वास निर्माण झाला नाही.
2016 मध्ये नूंह असे नामकरण
दोन्ही समुदायांमधील दरी वाढतच गेली. मेयो मुस्लीम काही प्रमाणात शेती करू लागले. याचदरम्यान 2005 मध्ये हरियाणाच्या गुडगावमधून वेगळा होता मेवातला एक नवा जिल्हा घोषित करण्यात आले. तर 2016 मध्ये मेवातचे नाव बदलून नूंह करण्यात आले. याच्या सुमारे दोन वर्षांनी 2018 मध्ये नीति आयोगाचा एक अहवाल समोर आला, ज्यात देशातील सर्वात मागास जिल्हा नूंह असल्याचे आणि तेथील सुमारे 79 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची असल्याचे नमूद होते. नूंहमधील बहुसंख्याक लोकसंख्या मेव मुस्लिमांची आहे. मेवातचे मुस्लीम पूर्ण देशात सर्वाधिक मागासलेले असल्याचे रंगनाथ मिश्रा यांच्या अहवालातही म्हटले गेले आहे. नूंहला लागून असलेल्या गुरुग्रामचे दरडोई उत्पन्न 3 लाख 16 हजार 512 रुपये इतके आहे, तर नूंहचे दरडोई उत्पन्न केवळ 27 हजार 791 रुपयेच आहे.
सांप्रदायिकतेची प्रयोगशाळा
मेवातला सांप्रदायिकतेची प्रयोगशाळा मानले जाते. मेव मुस्लीम गायीला प्राण्यांमध्ये सर्वात वरचा दर्जा देतात. मुलींच्या विवाहावेळी गाय दान करतात. गोवधावर बंदी घालण्याची मागणी ही या समुदायाकडून केली जाते. परंतु याच भागात गोरक्षेच्या नावावर काही जणांच्या हत्या देखील झाल्या आहेत. गोतस्करी करणाऱ्यांनी आणि गोतस्करी रोखणाऱ्यांनी याला गुन्ह्यापेक्षा अधिक सांप्रदायिक हिंसेचे रुप दिले आणि मेवात पुन्हा घायाळ झाले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या सांप्रदायिक हिंसेवेळी महात्मा गांधी यांनी मेवातमधील मुस्लिमांना भरवसा दिला होता. परंतु आता तेथील स्थिती बदलली असून दोन्ही समुदायांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी 19 डिसेंबर रोजी मेवातमधील महिला ‘भरोसा उठ गया मेवन का, गोली लगी है गांधी के छाती बीच’ हे गीत आवर्जुन म्हणत असतात.
- उमाकांत कुलकर्णी