कापड व्यावसायिकांच्या मागण्यांसाठी वजन मोजमाप अधिकाऱ्यांची घेतली भेट
बेळगाव : बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी वजन आणि मापन विभागाचे आयुक्त चंद्रशेखर बसवप्रभूजी यांची भेट घेतली. मोजमाप विभागाच्या कायद्याशी संबंधित प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी कापड व्यापाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. संघटनेचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कापड व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी त्यांची भेट घेतली. कापड व्यावसायिकांच्या सर्व समस्यांबाबत आपण तोडगा काढू, तसेच त्यांना वजन व मोजमाप विभागाची माहिती व्हावी, यासाठी कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षण देण्याचे आश्वासन मोजमाप विभागाच्या आयुक्तांनी दिले. यावेळी बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेक्रेटरी मुकेश खोडा, संचालक अरविंद जैन, माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यासह इतर उपस्थित होते.