वानखेडेवर मेस्सी, तेंडुलकर एका मंचावर आले एकत्र
वृत्तसंस्था/ मुंबई
प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर रविवारी भारतीय क्रीडा इतिहासातील आणखी एका गौरवशाली अध्यायाची भर पडून दोन महान खेळाडू, लायोनेल मेस्सी आणि सचिन तेंडुलकर येथील एका भव्य कार्यक्रमात एकाच मंचावर आले. आपल्या चार शहरांच्या ‘गोट इंडिया’ दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्यात मेस्सीने वानखेडेवर बरोबर एक तास घालवला. यावेळी त्याने तऊण फुटबॉलपटू, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू सुनील छेत्री तसेच मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींशी संवाद साधला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योवळी ’प्रोजेक्ट महादेव’च्या शुभारंभाची घोषणा केली, ज्याचा उद्देश राज्यभरातील तऊण फुटबॉलपटूंना शोधून त्यांचा विकास करणे हा आहे. भारताच्या 2011 च्या क्रिकेट विश्वचषक जेतेपदाचे ठिकाण असलेल्या या स्टेडियममधील संपूर्ण कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी ‘मेस्सी’च्या नावाचा जयघोष सुरूच ठेवला होता. सचिन तेंडुलकर सायंकाळी 5.45 च्या सुमारास आल्यानंतर थोड्याच वेळात अर्जेंटिनाचा हा महान खेळाडू त्याचे इंटर मियामीचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो दी पॉल यांच्यासह मैदानावर उतरला.
वानखेडेवर असंख्य वेळा सचिनचा जयघोष अगदी तो उपस्थित नसतानाही झालेला आहे. पण कदाचित पहिल्यांदाच या दिवशी जमलेल्या लोकांकडून मेस्सीच्या नावाचा जयघोष जास्त मोठ्या प्रमाणात झाला. परंतु, जेव्हा फलंदाजीतील या दिग्गजाला मेस्सीसोबत व्यासपीठावर बोलावण्यात आले तेव्हा सचिनच्या नावाचा जयघोष पुन्हा सर्वोच्च पातळीवर पोहोचला. ‘मी येथे काही अविस्मरणीय क्षण घालवले आहेत. याच मैदानावर अनेक स्वप्ने पूर्ण झाली आहेत आणि तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्ही 2011 मध्ये (क्रिकेट विश्वचषक) या मैदानावर ते सुवर्ण क्षण पाहू शकलो नसतो’, असे तेंडुलकरने गर्दीला संबोधित करताना सांगितले. ‘आज, या तिघांनाही येथे पाहणे हा मुंबई, मुंबईकर आणि भारतासाठी खरोखरच एक सोनेरी क्षण आहे. ‘लिओबद्दल काय बोलायचे? त्याने सर्व काही साध्य केले आहे. आम्ही त्याच्या समर्पण, दृढनिश्चय आणि वचनबद्धतेचे खरोखरच कौतुक करतो’, असे तेंडुलकर म्हणाला.
आपापल्या क्षेत्रातील हे दोन सुपरस्टार्स व्यासपीठावर एकत्र येण्यापूर्वी मेस्सीने वानखेडेवर एक अविस्मरणीय अनुभव घेतला. हा स्टेडियम त्याच्या आणि अर्थातच बार्सिलोनाच्या चाहत्यांनी खचाखच भरला होता. त्यामुळे या दौऱ्यावर आलेल्या त्रिकुटाला क्षणभर स्वत:ला विचारावेसे वाटले असेल की, आपण मुंबईत आहोत की, जिथे मेस्सीने अनेक विजेतेपदे मिळवत हंगाम घालवले त्या बार्सिलोनाच्या कॅम्प नोऊमध्ये आहोत. प्रेक्षकही वेळोवेळी ‘बार्का, बार्का’ आणि ‘सुआरेझ, सुआरेझ’ अशा घोषणा देत होते.
मेस्सीने भारताचा माजी फुटबॉल कर्णधार छेत्रीसोबत गप्पा मारण्यात काही वेळ घालवला आणि त्याला तसेच फडणवीस यांनाही आपली अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली. तसेच त्याने ‘मित्रा स्टार्स’ आणि ‘इंडिया स्टार्स’ या दोन संघांच्या सदस्यांशी संवाद साधला, ज्यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळला गेला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या तीन पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि मेस्सीला एक स्मृतिचिन्ह भेट दिले.