कोलकात्यात ‘मेस्सी’प्रेमींचा संताप
स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ : आयोजकांना अटक; ममता बॅनर्जी सरकारकडून चौकशीसाठी समिती स्थापन
वृत्तसंस्था/ कोलकाता
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा बहुप्रतिक्षित ‘जीओएटी इंडिया टूर’ सुरू झाल्यापासून वादात सापडला आहे. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी कोलकातामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी डम-डम विमानतळावर गर्दी केली होती. शहरातील रस्ते देखील फुटबॉल चाहत्यांनी भरलेले होते. तथापि, साल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी 14 वर्षांनी शनिवारी भारतात आला. उरुग्वेचा स्ट्रायकर लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा मिडफिल्डर रॉड्रिगो डी पॉल त्यांच्यासोबत तो होता. हे तिन्ही फुटबॉलपटू पहाटे अडीच वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचले. सकाळी 11 वाजता मेस्सीने त्यांच्या 70 फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. याप्रसंगी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान देखील उपस्थित होता. समारंभानंतर खेळाडू सॉल्ट लेक स्टेडियमवर पोहोचले असता तिथे चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. तथापि, सुमारे 22 मिनिटांनी तिन्ही खेळाडू कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये गोंधळ घातला. मेस्सी फक्त 10 मिनिटांसाठी उपस्थित राहिल्याने चाहते संतप्त झाले. याप्रसंगी स्टँडवरून बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याबद्दल माफी मागावी लागली. शिवाय राज्य सरकारने याबाबत चौकशीचे आदेश देत समितीही स्थापन केली आहे. याप्रकरणी मुख्य आयोजक सताद्रु दत्ता यांना अटक करण्यात आली आहे, असे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था जावेद शमीम यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय फुटबॉल महासंघाने या गोंधळप्रकरणी हात झटक हा आपला कार्यक्रम नाही आणि त्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
मेस्सीने कमी वेळ दिल्याने चाहत्यांचा भडका
सॉल्ट लेक स्टेडियममधील चाहत्यांना त्यांचा आवडता फुटबॉल स्टार जास्त काळ पाहण्याची आशा होती, परंतु मेस्सी फक्त 10 मिनिटांसाठी तिथे होता. प्रेक्षकांना हे कळताच वातावरण तणावपूर्ण झाले. बाटल्या फेकण्यात आल्या आणि त्यानंतर मैदानावर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना खूप मेहनत घ्यावी लागली.
महागडी तिकिटे, पण स्वप्ने अपूर्ण
कोलकात्यातील फुटबॉलची आवड लपून राहिलेली नाही. मेस्सीच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी 5,000 रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतची तिकिटे खरेदी केली होती. लोक तासन्तास वाट पाहत राहिले. परंतु अनेक चाहत्यांना एवढी मोठी किंमत मोजूनही मेस्सीला नीट पाहताही आले नाही. मेस्सीचा चेहराही पाहता आला नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला. हा संताप अपरिहार्य होता. अनेक चाहत्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप करत तोडफोड केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माफी
या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे माफी मागितली. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की साल्ट लेक स्टेडियममधील गैरव्यवस्थापनामुळे त्यांना खूप वाईट वाटले. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी जमलेल्या हजारो क्रीडा चाहत्यांच्या झालेल्या निराशेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व चाहत्यांची मनापासून माफी मागितली.
तपास समिती स्थापन, जबाबदारी निश्चित करणार
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती (निवृत्त) असीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीमध्ये मुख्य सचिव आणि गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समिती या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शिफारसी करणार आहे.
मेस्सीचा भारत दौरा अडचणीत?
कोलकाता येथील दंगलीनंतर मेस्सीच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. त्याच्या हॉटेलबाहेर मोठा जमाव जमल्यामुळे पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. मेस्सी पुढील टप्प्यात हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला भेट देणार आहे. कोलकाता येथील घटना या राज्यांसाठी एक इशारा ठरू शकते. जर लिओनेल मेस्सी किंवा त्याच्या व्यवस्थापन संघाला धोका वाटत असेल तर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तथापि, ‘जीओएटी इंडिया टूर’चे आयोजक असे करण्यास कचरत असल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. साहजिकच सर्वांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे आहे.