मेस्सी आणि भारत..!
फुटबॉल’ या खेळातील सदैव अजरामर खेळाडू कोण कोण आहेत..? असा अनेकवचनी प्रश्न आपण कुणालाही विचारला तर ब्राझीलचे पेले, अर्जेंटिनाचा मॅराडोना, अर्जेंटिनाचाच मेस्सी ही नावे सर्वात अगोदर आजच्या काळात येतील.
पोर्तुगालचा ख्रितीयानो रोनाल्डोही या गटात आता आलेला आहे. जरी त्याने फिफा विश्वचषक जिंकला नसला तरी..! कारण त्याने सर्वाधिक गोल केलेले आहेत, वय वाढले तरी त्याचा फिटनेस नव्या खेळाडूंना लाजवणारा आहे. आणि गोल नोंदविण्याची त्याची भूक अजूनही तितकीच तीव्र आहे. तसेच काही वर्षांपूर्वी जर याबाबत विचार केला असता तर नेदरलँड्सचे जोहान क्राएफ, जर्मनीचे बेकनबोर, ब्राझीलचा रोनाल्डो, रोनाल्डिनो, रोमारिओ, फ्रान्सचा झिनेदीन झिदान अशी 7-8 नावे या प्रकारात येतीलच.
तर मुद्दा हा आहे की, या खेळाडूंनी खेळलेल्या काळाचा विचार केल्यास पेले, मॅराडोना व मेस्सी या तिघांनी एकेका पिढीला आपल्या खेळाने असे काही प्रभावित केलेले होते व आहे की, त्यामुळे ‘फुटबॉल‘ हा खेळच ‘अधिक लोकप्रिय झाला’, असे म्हंटले तर ते चुकीचे होणार नाही. तर..आता विषय असा आहे की, अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी 13 डिसेंबरला दुसऱ्यांदा भारतात आला आहे. यापूर्वी तो 2011 मध्ये कोलकत्यात आलेला होता. जगभर जसे त्याचे चाहते आहेत तसेच त्याचे चाहते भारतातही आहेत.
मेस्सी आणि भारतीय चाहत्यांचे नाते
जगभरात मेस्सीचे चाहते आहेत, पण भारतातील फॅन बेस जगातील सर्वात मोठ्यांपैकी एक मानला जातो. भारतातील फुटबॉल पाहताना अनेकदा मेस्सी विरुद्ध रोनाल्डो अशी चर्चा होते. भारतातील कोट्यावधी तरुण खेळाडू त्यांना आपला आदर्श मानतात. भारताची क्रिकेट-प्रेमी संस्कृती असूनही, मेस्सीने भारतीय युवकांमध्ये फुटबॉलची आकर्षणता वाढवली. 2022 वर्ल्ड कप वेळी त्याचे विशाल कट आऊटस्, डिजीटल फ्लेक्स बोर्डस् कित्येक शहरांमध्ये, गावांमध्ये उभारलेले होते तर त्याने जिंकल्यानंतर भारतात रात्री उशिरापर्यंत आनंदोत्सव, केक कापणे, असे अनेक उपक्रम झाले. काही गावात तर मेस्सीचे मंदिर सुद्धा उभे केले गेले..! नेमकं याच गोष्टीची जाण ठेऊन, ही गोष्ट अचूक हेरून त्याचे भांडवल करून म्हणा हवे तर, ‘सतद्रू दत्ता‘ नामक एक बंगाली युवकाने उध्Aऊ हा इव्हेंट आखलेला आहे असं म्हणता येईल. मेस्सीला भेटायला आतुर असणाऱ्या चाहत्यांना मुंबईतील सर्वात कमी तिकीट दर 7 ते 8 हजार रूपये इतका आहे तर सर्वात जास्त दर साधारणपणे 25 ते 30 हजारच्या आसपास आहे. या तिकिटाव्यतिरिक्त मेस्सीशी हस्तांदोलन करण्यासाठी 10,000 रूपयांचा विशेष पास काढलेला आहे. यावरूनच तुम्हाला कल्पना येऊ शकेल की, मेस्सीचे भारतातील येणे किती मोठी आर्थिक उलाढाल घडवणार आहे.
आता.. मेस्सी भारतात येणार.. तेही कोलकता, हैदराबाद मुंबई आणि दिल्ली इथे भेटी देणार.. म्हंटल्यावर त्या त्या राज्यातील राजकीय मंडळी मागे कसे राहतील बरे..? अशा गोष्टी, असे इव्हेंट ाहम्asप् करण्यासाठी त्यांनीही आपल्या यंत्रणा हलवल्या आणि अगोदरच अदानी, जेएसडब्लू, एचएसबीसी यांचेसारख्या खूप मोठ-मोठ्या औद्योगिक कंपन्याच्या सहभागातून होत असलेल्या या इव्हेंटमध्ये आपणही हात धुवून घ्यायचा असा त्यांनीही निश्चय केला हे दिसू लागले.
महाराष्ट्र सरकारने लगेच ‘महादेवा प्रोजेक्ट’ची घोषणा केली. राज्यभरातील उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडूंचा शोध घेण्यासाठी टॅलेंट हंट सारखा उपक्रम घेतला. महाराष्ट्र राज्य फुटबॉल महासंघाची (sंघ्इA) ची मदत घेताना नुकतीच 30 मुले व 30 मुलींची निवड राज्यभरातून केली आहे. आता त्यांना मुंबईत सरावासाठी ठेवलेले आहे. आधीच एकूणचं मरगळ आलेल्या भारतीय फुटबॉलमुळे sंघ्इA लाही काहीतरी नवे आवश्यकच होते. ती संधी त्यांनीही घेतलेली आहे. मेस्सी सोबत त्या 60 मुलांना खेळायला मिळणार..असे सांगितलेले आहे. तसे आयोजक, राज्य सरकार यांचे नियोजन, आयोजन दिसते आहे.
आता प्रत्यक्षात वानखेडे स्टेडियमवर नेमकं काय..? आणि कसं कसं मेस्सीची दमछाक आयोजक व ही सगळी मंडळी करणार..? हे पाहणे औत्सुक्याचे, उत्सूकता वाढवणारे व काही अंशी काळजी वाटणारेही आहे. आता काळजी एवढ्याच अर्थाने की, गर्दीचा महासागर जर उसळला तर..? कारण मुख्य आयोजकांनी आखलेला इव्हेंट म्हणजे मेस्सी सोबत सेव्हन ए साईड सेलिब्रिटींचा सामना हे आकर्षण असणार आहे. तसेच पेनल्टी शूट आऊटस् विथ म्युझिकल कॉन्सर्ट हेही तिथंच आहे. त्यात त्याला 13, 14 व 15 अशा तीन दिवसांत देशाच्या उत्तर, मध्य, पश्चिम व पूर्व अशा चार दिशांचा बऱ्यापैकी वेळखाऊ असा प्रवास करावा लागणार आहे. ही सगळी त्याची प्रवासाची धावपळ, चाहत्यांचा गराडा, लाखोंची उपस्थिती..असं सगळं ते नीटनेटकेपणे पार पाडणे हेच जिकिरीचे असणार आहे. कारण तिकिटाशिवाय मेस्सी दर्शनाचा लाभ घेऊ इच्छिणारे चाहतेही मैदानाबाहेर, हॉटेलबाहेर, विमानतळावर अशा ठिकाणी गर्दी करू शकतात. ते नियंत्रण करणे हे वेगळेच काम असेल. त्यात राज्य सरकारांनी ऐनवेळी घेतलेल्या अधिकच्या सहभागामुळे नाही म्हंटले तरी राजकीय स्टाईलचा हस्तक्षेप कार्यक्रमात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या सगळ्यांकडे मेस्सी व त्याची व्यवस्थापन करणारी मंडळी कशी पाहते..? हेही पहावे लागेल.
कारण 13 तारखेला सकाळी तो कोलकत्ता येथे तर संध्याकाळी हैद्राबाद मध्ये असेल. लगेच 14 ला संध्याकाळी तो मुंबईत वानखेडेवर सायंकाळी 5 नंतर असेल. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील शाहरूख पासून ते रणबीर कपूर पर्यंत तर क्रिकेट मधील सचिनपासून धोनीपर्यत सगळेच मैदानावर असतील अशी चर्चा आहे. तर अशा या ‘न भूतो न भविष्यती..!‘ प्रकारच्या मेस्सीच्या इव्हेंटविषयी उत्सूकता ताणलेली आहे.
आपल्या महाराष्ट्रातील 60 मुलांना मेस्सीचा सहवास लाभणार आहे. त्यांचे फुटबॉल कौशल्य प्रत्यक्ष मैदानावर फार जवळून अनुभवता येणार आहे. त्याचेशी हस्तांदोलन ते खेळ हे सर्व त्यांचेसाठी आयुष्यभरासाठीची अनोमल अशी आठवण ठरणार आहे. विशेष म्हणजे, या 60 मध्ये आपल्या कोल्हापूरची 3 मुले व 2 मुली यांना सहभागी व्हायची संधी मिळालेली आहे. त्यांना आणि आपणा सर्व कोल्हापूरकरांसाठीही निश्चितच ही आनंदाची व कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्र शासनाने विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महादेवा प्रोजेक्टसाठी विशेष उत्साह दाखवला असल्याचे दिसते आहे. आणि या निवडलेल्या मुलांना पुढील 5 वर्षासाठी शासकीय खर्चाने मार्गदर्शन केले जाईल अशी त्यांची कल्पना आहे असे समजते. त्यामुळे यातील खेळाडूंना आपला फुटबॉल विकास व प्रगती करून घेण्याची चालून आलेली ही आयती संधी आहे असं म्हणता येईल. आता ही संधी कशी प्रगतीत परावर्तित होते हे वेळच ठरवेल. फक्त मेस्सी येऊन गेल्यानंतर पुढे काय..? हे ठरवणे, त्याप्रमाणे वाटचाल करणे गरजेचे आहे तरच ख-या अर्थाने मेस्सीचे भारतात येणे भारतीय फुटबॉलला टॉनिक देऊ गेले असं भविष्यात म्हणता येईल. तरीदेखील मेस्सीच्या तीन दिवसीय मुक्कामाने भारतीय फुटबॉलमध्ये चैतन्य नक्की येणार आहे. किमान भावी पिढीला त्यातून नक्की प्रेरणा मिळणार आहे. यातून एक नवा अध्याय सुरू व्हावा अशी अपेक्षा करूया.
अमरदीप कुंडले, कोल्हापूर