समितीचे युवा नेते शुभम शेळके यांचे कन्नड संघटनेच्या म्होरक्याला चोख प्रत्युत्तर
कन्नड संघटनेच्या म्होरक्याला चोख प्रत्युत्तर
बेळगाव : बेळगावमध्ये येऊन मराठी भाषिकांना खुले आव्हान देणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या म्होरक्याला म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाषिक तेढ निर्माण करून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याने जशास तसे उत्तर देण्यात आले. तसेच मराठी भाषिकांविरुद्ध गरळ ओकूनदेखील पोलीस, तसेच जिल्हा प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने त्यांचाही समाचार घेतला.
कन्नड रक्षण वेदिकेचा म्होरक्या रविवारी बेळगावमध्ये आला होता. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना डिवचून मराठी बोलायचं असेल तर महाराष्ट्रात निघून जा, असे बेताल वक्तव्य केले. तसेच काळादिन आचरण्यात येणाऱ्यांना सोडू नका, असा धमकीवजा इशारा देऊन मराठी भाषिकांना खुले आव्हान दिले होते. यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप दिसून आला. सोमवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून शुभम शेळके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही आमच्या भाषेच्या राज्यात जाण्यासाठी मागील 70 वर्षांपासून लढा देत आहोत. आमचा लढा हा कन्नड भाषा अथवा राज्य सरकारशी नसून तो केंद्र सरकार सोबतच आहे. मराठी भाषिकांनी कधीही राज्योत्सवाला विरोध केलेला नाही. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिकांवर अन्याय झाला. त्याला वाचा फोडण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून निषेधफेरी काढली जाते. त्यामुळे मराठी भाषकांच्या संयमाचा बांध सुटायला देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.
ही कीड वेळीच रोखा
शांतताप्रिय बेळगावमध्ये मराठी व कन्नडभाषिक गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात. परंतु बेंगळूर, तसेच इतर भागातून येऊन बेळगावमध्ये भाषिकवाद पेटविण्याचा प्रयत्न काही जणांकडून वारंवार होत आहे. शहरातील शांतता अबाधित ठेवायची असेल तर अशा प्रकारची कीड वेळीच रोखली पाहिजे. अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील, असा इशारा शुभम शेळके यांनी दिला आहे.