रस्ते दुरुस्ती-बससाठी म. ए. समितेतर्फे निवेदन
बेळगाव : यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील बाची गावापर्यंत तर रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. तेव्हा तातडीने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करावे आणि ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करावी या मागणीसाठी तालुका म. ए. समितीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम खाते व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव-वेंगुर्ला रोड हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रस्त्यावर अनेक गावे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरूनच कचऱ्याची वाहनेही ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करावे. याचबरोबर बडस ते बाकनूर, मच्छे ते वाघवडे, कंग्राळी ते कडोली, पिरनवाडी ते किणये, उचगाव ते बेकिनकेरे, पूर्व भागातील शिंदोळीसह इतर गावातील रस्ते खराब झाले आहेत. तेव्हा तातडीने यासाठी निधी मंजूर करावा आणि या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
जनता-विद्यार्थ्यांचे हाल
ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे जनता आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बससेवा सुरळीत करावी, यासाठी परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रकांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार व तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, चिटणीस एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, अॅड. सुधीर चव्हाण, आर. के. पाटील, डी. बे. पाटील, मनोहर संताजी, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील, मल्लाप्पा गुरव, संतोष मंडलिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.