म. ए. समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाही
पोलीस आयुक्तांची माहिती : अधिवेशनासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. परंतु सध्या बेळगावमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे महामेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली. तशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. तरीदेखील महामेळावा भरविण्यात आल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली. म. ए. समितीने सोमवारी व्हॅक्सिन डेपो परिसरात महामेळाव्याचे आयोजन केले होते. यासाठी पोलीस प्रशासन, तसेच जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती.
परंतु महामेळाव्याला पोलिसांची परवानगी नाही, अशी माहिती सोमवारी पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना दिली. शहरातील कोणत्याही मैदानावर महामेळावा भरविण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महामेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावमध्ये होत असल्याने यासाठी 6000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुवर्ण विधानसौध, आंदोलनस्थळ, विमानतळ, रेल्वेस्थानक तसेच शहरातील महत्त्वाच्या जागांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.