म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती
आजच्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी-जांबोटी भागातील गावांमध्ये 8 डिसेंबरच्या मेळाव्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कणकुंबी भागातील नागरिकांना पत्रके वाटप करून जागृती करण्यात आली. 2004 साली महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरवून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करून आपला निषेध नोंदवीत असते.
यावर्षी देखील 8 डिसेंबरला कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे होणार आहे. त्याच दिवशी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी माणसाने बहुसंख्येने उपस्थित रहावे, यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर तालुक्यात सर्वत्र जनजागृती करण्यात येत आहे. शनिवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कणकुंबी येथे घरोघरी पत्रके वाटून जनजागृती केली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, मध्यवर्ती सदस्य राजाराम देसाई, राजाराम गावडे, रमेश खोरवी, भिकाजी महाले, दिलीप गवस, शिवाजी दळवी, लक्ष्मण गावडे, नारायण बांदेकर, महादेव गावडे, तानाजी सावंत, गणपती वरंडेकर, विभा गावडे, विठ्ठल गावडे, सोमन्ना गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.