For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीवदया बेतली युवकाच्या जीवावर

11:04 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीवदया बेतली युवकाच्या जीवावर
Advertisement

जखमी कुत्र्याला वाचवताना किणयेच्या युवकाचा रेबीजने मृत्यू

Advertisement

बेळगाव : बसच्या ठोकरीने गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याला जीवदान देण्यासाठी प्रयत्न केलेल्या युवकालाच रेबीजमुळे आपला जीव गमवावा लागला. किणये (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून तरुणाच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिषेक नामदेव पाटील (वय 34) रा. किणये असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. व्यवसायाने मेकॅनिक असणारा अभिषेक एक उत्तम कार्यकर्ताही होता. अडीच महिन्यांपूर्वी बसने ठोकरल्याने त्यांचा पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाला होता. जखमी कुत्र्याच्या मदतीसाठी धावलेल्या अभिषेकच्या आईवर या कुत्र्याने हल्ला केला. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. अपघातात कुत्र्याच्या पोटातील आतडी बाहेर पडली होती. जीवदया दाखवून अभिषेकने आतडी पोटात ढकलून कुत्र्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला होता. स्वत:च कुत्र्यावर उपचार केले होते. तेव्हापासून कुटुंबीय व नागरिक त्यालाही उपचार घेण्याचे सल्ले देत होते. मात्र, याकडे त्याने दुर्लक्ष केले. आपल्याला श्वानदंश झाला नाही. त्यामुळे उपचार कशाला? असे त्याचे म्हणणे होते. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तो रेबीजमुळे त्रस्त असल्याचे लक्षात आले. गुरुवारी 18 एप्रिल रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी धडपड करून या तरुणाला स्वत:चाच जीव गमवावा लागला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.