मर्सिडीजचा रसेल विजेता, रेड बुलचा व्हर्स्टापेनकडे चौथ्यांदा वर्ल्ड टायटल
वृत्तसंस्था/ लास वेगास
मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या लास वेगास फॉर्मुला वन ग्रां प्रि शर्यतीनंतर सलग चौथ्यांदा एफ वनचे वर्ल्ड टायटल पटकावले. मात्र येथील शर्यतीत मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने आपलाच संघसहकारी लेविस हॅमिल्टनला मागे टाकत जेतेपद पटकावले. फेरारीच्या कार्लोस सेन्झने तिसरे स्थान मिळविले.
व्हर्स्टापेनने या शर्यतीत मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसला मागे टाकत 10 गुण घेत पाचवे स्थान मिळविले आणि चारदा ड्रायव्हर्स वर्ल्ड टायटल जिंकणाऱ्या निवडक ड्रायव्हर्सच्या यादीत स्थान मिळविले. या मोसमातील अजून दोन शर्यती बाकी असतानाच व्हर्स्टापेनने ड्रायव्हर्स टायटल निश्चित केले. पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या मर्सिडीजच्या रसेलने प्रारंभी फेरारीच्या चार्लस लेक्लर्ककडून आलेला दबाव व नंतर मर्सिडीजचा त्याचा संघसहकारी हॅमिल्टनचे कडवे आव्हान मोडून काढत 50 लॅपच्या या शर्यतीत जेतेपद पटकावले. या वर्षातील त्याचे हे दुसरे तर मर्सिडीजचे दुसरे जेतेपद आहे. याआधी जुलैमध्ये बेल्जियन ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद मिळविले होते.
हॅमिल्टनने सात सेकंदाने मागे राहत दुसरे स्थान मिळविले. फेरारीच्या लेक्लर्कने चौथे, व्हर्स्टापेनने पाचवे, मॅक्लारेनच्या नोरिसने सहावे, मॅक्लारेनच्या पियास्ट्रीने सातवे, हासच्या निको हुल्केनबर्गने आठवे, आरबीच्या त्सुनोदाने नववे व रेडबुलच्या एस. पेरेझने दहावे स्थान मिळविले.