महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानसिक आरोग्य...सजगता हवी..

06:44 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विनयला अलीकडे झोप लागत नव्हती. दिवसरात्र तो अस्वस्थ असे. आईला जरा बाहेर जाऊ देत नसे. काहीतरी होईल अशी त्याला भीती वाटे. छातीत धडधडू लागे आणि खूप रडू येई. विनयची आत्या आली आणि सांगू लागली, ‘मी सखोल चौकशी केली आहे. त्या माणसाने छातीठोकपणे सांगितले आहे की याच्यावर कुणाची तरी छाया पडली आहे. माझ्याकडे घेऊन या. मी ती घालवितो. वगैरे..

Advertisement

मीना दोन दिवस सारखी बडबडत होती. शहाण्यासारखी कॉलेजला जाणारी ही मुलगी एकाएकी विनाकारण चिडायला लागली, मोठ्याने हसू लागली. मी अवतार आहे. माझ्या आसपास येऊ नका. जाणार नाही..वगैरे बडबडू लागली. आई वडील घाबरले. मांत्रिकाला घेऊन आले. अंगारे धुपारे झाले पण उपयोग होईना..

Advertisement

हे भूत जबरदस्त आहे.. हे झाड तिला सोडायला तयार नाही असे तो सांगू लागला. त्याने काही अघोरी उपाय सुचविले परंतु तिच्या वडिलांना कुठेतरी ते चुकीचे आहे हे वेळेत उमगले आणि मनोविकारतज्ञांकडे उपचारासाठी तिला नेण्यात आले.

मिहिरची तऱ्हा आणखी वेगळी. त्याला कोपऱ्यामध्ये कुणी उभे आहे असे वाटे. मध्येच त्याचे डोळे पांढरे होत आणि दातखीळी बसे. गेले दोन तीन दिवस असेच सुरु होते. या विचित्र आजाराबद्दल गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. कुणी म्हणे हे वाताचे दुखणे आहे. कुणी म्हणे हे काहीतरी विचित्र आहे. त्याला दिसते पण आम्हाला कसे काही दिसत नाही. त्याच्या आईला वाटत होते की आपल्या मुलाला कुणीतरी झपाटले आहे. चार दिवसांपूर्वी तिन्हीसांजेला मित्रांसोबत कुठेतरी बाहेर गेला होता आणि नदीकाठी त्यांनी बराच वेळ घालविला होता. तिथेच भूत लागले असावे असा त्याच्या आईचा अंदाज होता.

पहा हं.. वरच्या उदाहरणातील माणसांसारखी अनेक माणसे, त्यांचे अंदाज हे सारं अनेकदा पहायला मिळतं.

दैवी किंवा अघोरी शक्तीमुळे मनोविकृती उत्पन्न होते असा गैरसमज आजही अनेक ठिकाणी आढळतो. भूताने पछाडले, करणीबाधा झाली, छाया पडली, सारणी झाली अशा अनेक प्रकारे याचे वर्णन केले जाते. मनोविकृतीने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात विचित्रपणा आढळतो. आमची मीना अशी नव्हती हो. आता सारखी बडबड करते. कधी कुणाला उलटुन बोलत नसे हो. नक्की कुणीतरी झपाटलंय तिला! असे निष्कर्ष काढून माणसे मोकळी होतात.

आजही अनेक ठिकाणी अशा समजूती आढळतात. पहा हं, इतिहासाच्या सुरुवातीला सर्व नैसर्गिक घटना हे दैवी चमत्कारच मानले गेले. चंद्राला लागलेले ग्रहण, कडाडणारी वीज यामागे दैवी कोप आहे असे मनुष्य समजत होता. विज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली तसे अनेक घटनांमागची रहस्य उलगडत गेली. एकेकाळी शारीरिक आजार हा सुद्धा दैवी कोप आहे असं खेडोपाडी लोक मानत असत. जसजसा रोगांवर लस टोचून घेण्याचा उपाय सापडला, जनजागृती होऊ लागली तसतसा हा समज मागे पडू लागला. परंतु होते असे की, शारीरिक रोगांमागील कारणं माणसाला समजू शकतात. जसे रोगजंतूमुळे ताप येतो, इनफेक्शन्स होऊ शकतात हे लोकांना आता पटते. एखादी दुखापत झाली तर शारिरीक इजा दिसते. परंतु मनोविकृतींच्या बाबतीत तसा चटकन् उलगडा होत नाही.

शारीरिक आजारात समजा डोळा दुखतोय, पोट दुखतंय तर त्या इंद्रियांवर बोट ठेवता येते. तसे मानसिक आजारात मात्र करता येत नाही. एखादा माणूस विचित्र वागू लागला की, तो असं मुद्दाम वागतोय की दुसरी कुठची शक्ती हे वर्तन त्याच्याकडून घडवून आणते आहे असे प्रश्न बाकीच्यांसमोर उभे राहतात. एरवी चारचौघांसारखा वागणारा माणूस वेगळा वागू लागला, विसंगत वागू लागला की त्याला ‘बाहेरची बाधा’ झाली असं आसपासची माणसे मानू लागतात. माझा मुलगा, मुलगी, माझा पती वा पत्नी, माझी आई, माझे वडील असं वागू शकतील ही कल्पनाही माणसाला सहन होत नाही. त्यांचे मन आजारी पडले असेल हे लक्षात घेतले जात नाही.खरंतर मानसिक समस्यासुद्धा एका रात्रीमध्ये उत्पन्न होत नाही. परंतु आपण जर मनामध्ये डोकाऊन पहातच नसू तर मनातली खळबळ आपल्याला कळणार नाही.

मुळातच आपले आपल्या मनाकडे किती लक्ष असते हा प्रत्येकाने स्वत:ला विचारावा असा प्रश्न आहे. रोजच्या रोज आपण आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष देत असतो. जसे सकस अन्न, व्यायाम हे शारिरीक आरोग्य निकोप राखायला आवश्यक आहे तसेच शरीराची स्वच्छता राखणे हा ही त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. रोज हातपाय स्वच्छ धुणे, दात घासणे, अंघोळ करणे हे आपण न चुकता करत असतो. म्हणजेच शरीराच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण सजग असतो आणि अर्थात असायलाही हवे परंतु मानसिक आरोग्याची..मनाच्या स्वच्छतेची इतकी काळजी आपण घेतो का?

रोज आपला अनेक माणसांशी संपर्क येतो, अनेक बरे वाईट प्रसंग, अनुभव येत असतात. हे अनुभव, क्षण, आठवणी जर सुखाच्या असतील तर त्या आनंद देतील परंतु दु:खाच्या वा त्रासदायक असतील आणि त्या वेळेवर मनातून काढल्या गेल्या नाहीत तर चिंता, भीती, अस्वस्थता, राग अशा विघातक भावनांचा कचरा मनामध्ये साठत जाईल आणि एक दिवस उग्र समस्येचे रुप समोर येईल. मनामध्ये साठणारा हा कचरा योग्यवेळी साफ केला गेला नाही तर हळूहळू मानसिक आरोग्य धोक्यात यायला सुरुवात होईल.

आपण साधी गाडी जरी घेतली तरी तिचे सर्व्हिसिंग करतो, ती गाडी नीट रहावी यासाठी काळजी घेतो. इतकी काळजी आपण मनाची तरी घेतो का? विचार, भावना याकडे लक्ष देतो का? दिवसाकाठी किमान एकदा स्वस्थ बसुन आपल्या मनात काय चालले आहे, कोणते विचार, भावना निर्माण होतायत हे पाहतो का?खरंतर स्वत:च्या मनामध्ये डोकावण्याचे कौशल्य प्रत्येकाने शिकायला हवे.

मनामध्ये विचार येणे, विविध भावना निर्माण होणे हे नैसर्गिक आहे परंतु त्याकडे जर आपले लक्ष नसेल तर गोंधळ होतो. एखादी असुखकारक भावना/विचार किती तीव्रेतेने जाणवते/जाणवतो, सातत्याने तसेच जाणवते का? ती भावना/विचार कितीकाळ आपले मन व्यापते/व्यापतो याकडे आपले लक्ष हवे. चिंता, भीती, अस्वस्थता, राग अशा भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी अधिक असेल तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये कमीपणा कसलाच नाही. शरीर जसे आजारी पडू शकते तसे मनही आजारी पडू शकते याचा स्विकार करायला हवा. इतर गोष्टींच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यापेक्षा मनही आजारी पडू शकते याचा स्विकार करायला हवा. त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यामुळे ती समस्या सोडवता तर येईलच, शिवाय एका समस्येमधून निर्माण होणाऱ्या इतर अनेक समस्या, प्रश्न टाळता येतील आणि मानसिक आरोग्य पर्यायाने शारीरिक आरोग्यही उत्तम रहायला मदत होईल हे मात्र खरे!!!

 -अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article