For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिणेत पुरूष की महिला?

06:57 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिणेत पुरूष की महिला
Advertisement

संभ्रम सोडविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गृहमंत्र्यांची घेतली भेट,

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून सर्वात आधी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतलेल्या भाजपचे दक्षिण गोव्यातील उमेदवार निश्चितीवरून मात्र घोडे अडले आहे. हा तिढा सोडविताना भाजपची पूरी दमछाक झाली असून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या कैक वाऱ्या केल्यानंतरही अद्याप यश हाती लागत नाही, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे.

Advertisement

उत्तर गोव्यासाठी विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्याच नावाची घोषणा केल्यानंतर लगेचच दक्षिणेतील उमेदवार जाहीर होईल अशी अटकळ होती. परंतु मध्येच या मतदारसंघासाठी महिला उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाल्यामुळे भाजपसह संपूर्ण राज्यातील लोक अचंबित झाले होते. त्याही पुढे जाताना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह तब्बल चार नावेही चर्चेत आल्यामुळे विद्यमान इच्छुक पुरूष उमेदवारांमध्ये नाराजी पसरली होती.

भाजप महिला उमेदवार देत असेल तर आपणाला लॉटरीच फुटेल या विचाराने विरोधी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा अंदाज घेतल्यानंतर आता महिला उमेदवार देणे परवडणारे ठरणार नाही याची जाणीव भाजपला झाली असून तो नाद सोडून देत त्यांनी पुन्हा पुरूष उमेदवाराकडे मोर्चा वळविल्याचे वृत्त आहे.

तोच विचार घेऊन शनिवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत पोहोचले असून त्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांशी चर्चाही केल्याचे वृत्त आहे. भाजपने दक्षिण गोव्यासाठी पाच नावांचा विचार चालविला होता. त्यात विद्यमान सभापती रमेश तवडकर यांच्यासह आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दामू नाईक आणि माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचा समावेश होता. परंतु त्यापैकी तवडकर आणि कामत यांनी इच्छा नसल्याचे कळविल्यामुळे भाजपची मदार नाईक, कवळेकर व सावईकर यांच्यावरच अवलंबून राहिली आहे. सध्या त्यापैकी सावईकर यांचे पारडे जड असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. उद्या सोमवारपर्यंत सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपच्या या संथ चालीचा अंदाज घेऊन अन्य विरोधी पक्षांनी आपापल्या उमेदवार निश्चितीस गती दिली आहे. त्यापैकी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीरही केले आहेत. काँग्रेसमधून उत्तर आणि दक्षिणेसाठी दोन नावे चर्चेत असली तरीही सध्या दक्षिण गोवा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्यामुळे तेथे ते नवीन चेहरा देतील की विद्यमान खासदारालाच पुन्हा संधी देतील हे पहावे लागणार आहे. उत्तर गोव्यातूनही काँग्रेससाठी एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याचे वृत्त असून सध्या गोव्यात दाखल झालेले त्यांचे प्रभारी माणिकराव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या दरम्यान, दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सर्वप्रथम गोव्यातील एसटी समाजाला विधानसभेत आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

Advertisement
Tags :

.