मेलबर्नची खेळपट्टी बाऊन्स अन् वेग देणारी
वेगवान गोलंदाजांचा राहणार दबदबा : मुख्य क्युरेटरकडून खुलासा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बुमराहशिवाय गोलंदाजांपैकी कोणीही विशेष कामगिरी करू शकला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. या संपूर्ण मालिकेत खेळपट्टीची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. मेलर्बनमध्ये होणाऱ्या चौथ्या अर्थात बॉक्सिंग डे कसोटीत पुन्हा वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळणार असल्याचे खेळपट्टीवर मुख्य क्युरेटर मॅट पेज यांनी दिले आहेत.
उभय संघात होणाऱ्या मेलबर्न कसोटीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे. जी मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी खूप महत्त्वाची असेल. याबाबत बोलताना मुख्य क्युरेटर पेज म्हणाले, ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करेल. मात्र या खेळपट्टीवर फलंदाजांनी थोडी सावधगिरी बाळगून खेळल्यास ते चांगली कामगिरी करु शकतात. सात वर्षांपूर्वी आम्ही अतिशय सपाट खेळपट्टी बनवायचो, आम्हाला एक रोमांचक कसोटी सामना करायचा आहे, त्यामुळे आम्ही अधिक गवत सोडू, ज्याचा गोलंदाजांना फायदा होईल. पण नवीन चेंडू आल्यानंतरही तो फलंदाजीसाठी चांगला आहे.
खेळपट्टीवर सहा मिमी गवत
पेज खेळपट्टीबाबत बोलताना पुढे म्हणाले, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टीत पुरेसा वेग आणि उसळी असेल. यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे. पर्थच्या या खेळपट्टीवर मी वेग आणि चांगला बाउन्स सेट करत आहे. साधारणपणे खेळपट्टीवर 6 मिमी पर्यंत गवत सोडण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पहिल्या सत्रापासूनच चेंडूला उसळी मिळणार असून वेगवान गोलंदाजांना याची खूप मदत होईल. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्याकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्यामुळे हा सामना नक्कीच रोमांचकारी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नाणेफेकीचा कौल महत्वाचा
ऑस्ट्रेलियात खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी आव्हानात्मक असते. येथील प्रत्येकी खेळपट्टी आपल्या अनोख्या वैशिष्ट्यासाठी ओळखली जाते. पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न व सिडनी या ठिकाणी प्रत्येक विकेट वेगळी असते. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा इतिहास पाहिला तर याठिकाणी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. अर्थात, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या तीन खेळपट्टीवर गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. आता, मेलबर्नचे पीचही गोलंदाजांना अनुकूल असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय गोलंदाजांसाठी ही आनंददायी बातमी आहे. अर्थात, नाणेफेकीचा कौल देखील महत्वाचा ठरणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यास तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. याचा फायदा भारतीय संघाला होईल, यात शंकाच नाही.
सिराजचा पत्ता होणार कट, प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता?
जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार हे निश्वित आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराजच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात संधी मिळू शकते. कारण सिराजला अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे तिसऱ्या सामन्यात आकाश दीप प्रभावी ठरला. अशा स्थितीत त्याला आणखी एक संधी मिळू शकते. नितीश रे•ाr आणि रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू भूमिका दिल्या जाऊ शकतात. याशिवाय, आर.अश्विनच्या जागी मुंबईचा युवा गोलंदाज तनुष कोटियनला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ट्रेव्हिस हेडला दुखापत, चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत सांशकता
ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी मंगळवारी सांगितले की, गाबा कसोटीदरम्यान हेडला मांडीच्या स्नायूमध्ये ताण जाणवला. हेडच्या दुखापतीवर निवड समितीचे बारकाईने लक्ष आहे. हेडला तंदुरुस्तीची चाचणी द्यावी लागणार असून यानंतर तो चौथ्या कसोटीत खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.