मेहुली, मानिनी अपयशी भावेशचे आव्हान जीवंत
वृत्तसंस्था / निंग्बो (चीन)
आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात शुक्रवारी भारताच्या मेहुली घोष आणि मानिनी कौशी यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. मात्र पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या भावेश शेखावतचे आव्हान जीवंत राहिले आहे.
महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात पात्र फेरीमध्ये मेहुली घोषला 23 व्या स्थानावर तर मानिनी कौशिला 45 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात भारताची आणखी एक नेमबाज सुरभी भारद्वाज 52 व्या स्थानावर राहिली. नॉर्वेच्या जिनेटी हेग डस्टेडने 466.2 गुणासह सुवर्णपदक तर डेन्मार्कच्या रिकी इबसेनने 463.3 गुणांसह रौप्य आणि झेकच्या बार्बोरा डुबसेकने 451.4 गुणांसह कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत भारतीय नेमबाजांना शुक्रवाराचा दिवस अपयशी ठरला. भारताला या स्पर्धेत अद्याप पदक तक्त्यात आपले खाते उघडता आलेले नाही तर चीनने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकासह पहिले स्थान तसेच नॉर्वेने 2 सुवर्णपदकांसह दुसरे आणि द. कोरियाने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदकासह तिसरे स्थान घेतले आहे.
पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत भारताचा नेमबाज भावेश शेखावतने पात्र फेरीत 293 गुणांसह चौथे स्थान मिळवून आपले आव्हान जिवंत राखले आहे. या क्रीडा प्रकारात भारताचा मनदीप सिंग 43 व्या स्थानावर राहिला.