मेहिदी हसन-अलीची अर्धशतकांसह विक्रमी शतकी भागीदारी
बांगलादेशला डावाचा पराभव टाळण्यात यश, रबाडाचे 4, केशवचे 3 बळी
वृत्तसंस्था/ मिरपूर, ढाका
मेहिदी हसन मिराज व जाकेर अली यांनी नोंदवलेल्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डावाचा पराभव टाळण्यात यश मिळविले. मिराजने नाबाद 87 तर जाकेर अलीने 58 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवशीअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात 7 बाद 283 धावा जमविल्या असून त्यांनी 81 धावांची आघाडी मिळविली आहे.
पाऊस व अंधुक प्रकाश यांचा व्यत्यय आलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची स्थिती 6 बाद 112 अशी झाली होती आणि डावाचा पराभव अटळ वाटत होता. पण मेहिदी हसन मिराज व जाकेर अली यांनी सातव्या गड्यासाठी विक्रमी 138 धावांची भागीदारी करीत डावाचा पराभव टाळण्यात यश मिळविले. कोणत्याही गड्यासाठी द.आफ्रिकेविरुद्ध नोंदवलेली ही बांगलादेशची सर्वोच्च भागीदारी काहे. जाकेर अली 111 चेंडूत 7 चौकारांसह 58 धावा काढून बाद झाल्यानंतर नईम हसनने मिराजला चांगली साथ दिली आणि या जोडीने दिवसअखेर आणखी पडझड होऊ न देता संघाला 7 बाद 283 धावांची मजल मारून देताना अभेद्य 33 धावांची भागीदारी केली. नईम 16 धावांवर खेळत आहे.
बांगलादेशने पहिल्या डावात 106 धावा जमविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने काईल व्हेरेनच्या (114) शतकाच्या जोरावर सर्व बाद 308 धावा जमवित बांगलादेशवर 202 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर दुसऱ्या डावातही कागिसो रबाडा व फिरकी गोलंदाज केशव महाराज यांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशची स्थिती 6 बाद 112 अशी झाली होती. 3 बाद 103 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळास बांगलादेशने प्रारंभ केला. पण रबाडाने दोन झटपट बळी मिळविले. सलामीवीर मेहमुदुल हसन पहिल्या स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला, त्याने 40 धावा केल्या. कसोटीमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला बांगलादेशी फलंदाज बनलेला मुश्फिकुर रहीम रबाडाच्या एका स्किड झालेल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने 39 चेंडूत 33 धावा काढल्या.
नंतर केशव महाराजने लिटन दासला 7 धावांवर बाद केल्यानंतर द.आफ्रिकेला झटपट विजय मिळणार अशी आशा वाटू लागली. पण मेहिदी हसन मिराज व जाकेर अली यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावत शतकी भागीदारी नोंदवत त्यांच्या आशेला धक्का दिला. दोघांनीही महाराज व रबाडा यांचा भेदक मारा व्यवस्थित खेळून काढला मिराजने डेन पीटला षटकार ठोकल्यानंतर महाराजला डीप मिडॉफच्या दिशेने चेंडू मारून एक धाव घेत नववे कसोटी अर्धशतक नोंदवले. 94 चेंडूत त्याने ही मजल मारली. केशव महाराजनेच ही जोडी फोडताना जाकेर अलीला पायचीत केले. मेहिदी हसन मिराजने 171 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार व 1 षटकार मारला. त्याने नईमसमवेत डाव लांबवला असून अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. रबाडाने 35 धावांत 4 तर केशव महाराजने 105 धावांत 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 106, द.आफ्रिका प.डाव 308, बांगलादेश दु.डाव 85 षटकांत 7 बाद 283 : मेहमुदुल हसन जॉय 40, नजमुल हुसेन शांतो 23, मुश्फिकुर रहीम 33, मेहिदी हसन मिराज खेळत आहे 87, जाकेर अली 58, नईम हसन खेळत 16, अवांतर 18. रबाडा 4-35, केशव महाराज 3-105