तीनशे किलो फुलांनी सजली मेघडंबरी
पहिल्या श्रावण सोमवारी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
सोलापूर :
यंदाच्या वर्षातील पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर फुलांनी फुलून गेले. योग समाधीवरील मेघडंबरीची ३०० किलो फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‘ॐ नम: शिवाय’ च्या गजरात भक्तांनी हजेरी लावली. भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी लवकरच रांगेत उभी राहिली होती.
प्रत्येक श्रावण सोमवारी योग समाधीवरील मेघडंबरीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. यंदाच्या श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त विशेष सजावट करण्यात आली होती. झेंडू, शेवंती, चिनी गुलाब, सुपारी फुल, गुलाब यांसारख्या विविध रंगीबेरंगी फुलांनी मेघडंबरी सजवली गेली. मेघडंबरीच्या कळसावर महादेवाच्या पिंडीची आणि शेषनाग फणीची प्रतिकृती साकारण्यात आली होती, जी भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.
सोमवारी पहाटे चारपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले. योग समाधीची विधीवत पूजा सकाळी ८:३० ते ९:०० या वेळेत पार पडली. संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला होता.
या वेळी मंदिरात सिध्देश्वर महाराज यांची हुबेहुब छबी दर्शवणारी एक आकर्षक रांगोळीही साकारण्यात आली होती. भक्तांनी यावेळी मंदिर परिसरात सेल्फी घेत धार्मिक आनंद साजरा केला. अनेक भाविक भक्तीभावात तल्लीन झालेले दिसून आले.
संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारलेला होता, आणि श्रावण सोमवारची ही पहिली सुरुवात श्रद्धा, उत्साह आणि भक्तीने परिपूर्ण झाली.