महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काळ्यादिनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

11:28 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 नोव्हेंबर रोजी निषेध फेरी काढणारच : म. ए. समितीचा निर्धार, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्तर देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनानिमित्त निषेध फेरी काढली जाते. या निषेध फेरीवेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होऊन केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात आपला रोष व्यक्त करतात. काळ्या दिनाच्या फेरीबाबत माहिती देण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कानडी प्रांतात डांबण्यात आला. याला विरोध म्हणून प्रतिवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून निषेध फेरी काढली जाते. निषेध फेरी ही राज्य सरकारविरोधात नाही तर केंद्र सरकार विरोधात काढण्यात येत असल्याने राज्य सरकारने या फेरीला परवानगी देण्याची मागणी म. ए. समितीकडून करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपली बाजू मांडली.

Advertisement

निषेध फेरीची तारीख बदलल्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्वी 6 ते 7 वर्षे काळा दिन पाळण्यात येत होता, हे स्पष्ट केले. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे धार्मिक सण असून सीमाप्रश्न हा एक लढा आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परवानगी संदर्भात निरोप देतो, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी निषेध फेरी काढण्यासंदर्भात पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्तर देऊ, असे सांगितले. प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी निषेध फेरी काढणारच, असा निर्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, सेक्रेटरी मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, तालुका म. ए. समितीचे सेक्रेटरी अॅड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, पियुष हावळ यांसह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article