4 राज्यांमध्ये स्लीपर सेल, सीक्रेट अॅपवर मीटिंग
भारतासाठी धोका ठरतोय हिज्ब उत तहरीर : एनआयकडून कारवाईला प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दहशतवादी संघटना हिज्ब उत तहरीरवरून भारतात सुरक्षा यंत्रणांच्या चिंता वाढल्या आहेत. सरकारशी संबंधि अधिकाऱ्यांनुसार एनआयएने मागील आठवडयात दोन दिवसीय दहशतवाद विरोधी परिषदेत भारतात ‘हिज्ब-उत-तहरीरच्या वाढत्या कारवायां’वर चर्चा केली आहे. तेलंगणा, तामिळनाडू, गुवाहाटी पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि बीएसएफचे दहशतवादविरोधी तज्ञ या चर्चेत सामील झाले होते.
लेबनॉन स्थित कट्टरवादी समूह हिज्ब-उत-तहरीरचे अस्तित्व प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये असून यात ब्रिटनचाही समावेश आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पॅलेस्टाइनच्या समर्थक निदर्शनांनंतर या संघटनेवर तेथे बंदी घालण्यात आली होती. भारताने अलिकडेच या समुहावर अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियम, 1967 च्या अंतर्गत बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल मध्यप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात निर्माण झाले आहेत.
एनआयएकडून तपास सुरू
दोन दिवसीय परिषदेदरम्यान सादर केस स्टडीत मध्यप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाकडून चालू वर्षाच्या प्रारंभी पकडण्यात आलेल्या या संघटनेच्या मॉड्यूलविषयी माहिती सामील होती. हे प्रकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे चौकशीसाठी सोपविले होते. याप्रकरणी हिज्ब-उत-तहरीरच्या 17 सदस्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनआयएच्या तपासात या संघटनेचे सदस्य देशभरात फैलावलेले असल्याचे आढळून आले. या संघटनेकडून मध्यप्रदेशात गुप्तपणे सदस्यांची भरती केली जात होती असेही समोर आले.
इस्लामिक राष्ट्राचे लक्ष्य
आरोपी हिज्ब-उत-तहरीरच्या कट्टरवादी विचारसरणीने प्रेरित होते, या संघटनेचा उद्देश हा हिंसक कारवायांच्या माध्यमातून भारतात शरीया आधारित इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे आहे. या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणता सक्रीय आढळून आले आहेत. एनआयएने ऑक्टोबर महिन्यात तामिळनाडू आणि पु•gचेरीत हिज्ब-उत-तहरीरशी संबंधित अमीर फैजुल रहमानला अटक केली होती. 6 जणांना देशाविरोधात भडकविणे आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसक कारवायांसाठी पाकिस्तानकडून सैन्य मदत मागण्याचा आरोप रहमानवर आहे.
तंत्रज्ञानाचा कारवायांसाठी वापर
हिज्ब-उत-तहरीर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सुरक्षित अॅप्सचा वापर करून दहशतवादाला बळ देऊ पाहत आहे. तसेच युवांना दहशतवादी कृत्यांमध्ये सामील करू करण्यासाठी या दहशतवादी संघटनेकडून ‘दावा’ मीटिंग्स आयोजित केल्या जात आहेत. या दहशतवादी संघटनेची स्थापना 1953 मध्ये जेरूसलेम येथे झाली होती. याच्या पॅलेस्टिनी शाखेत शेकडो सदस्य असून त्यांच्यावर पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडून कारवाई करण्यात आली आहे.