पंतप्रधान मोदी, शाह, गांधी यांची बैठक
पुढील माहिती आयुक्त नियुक्त करण्याची प्रक्रिया
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बैठक झाली आहे. ही बैठक नव्या माहिती मुख्य आयुक्तांची (चीफ इनफॉर्मेशन कमिशनर) यांची नियुक्ती करण्यासाठी होती. नियमानुसार अशा पदांवरील मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती अशा प्रकारे केली जाते.
या बैठकीचा प्रारंभ साधारणत: दुपारी 1 वाजता बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात झाला होता. प्रथम अमित शाह कार्यालयात पोहचले. नंतर काही वेळातच राहुल गांधीही पोहचले. ही बैठक साधारणत: दीड तास चालली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना केली होती. तिला राहुल गांधी यांनी विरोध केला होता. गांधी यांनी आपले विरोधपत्र (डिसेंट नोट) बैठकीत सादर केले आहे, अशी माहिती नंतर काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे बैठकीत बहुमत असल्याने त्यांनी ठरविलेले अधिकारीच पुढचे माहिती मुख्य अधिकारी असतील, हे निश्चित झाले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमानुसार बैठक
माहिती अधिकार कायद्याच्या अनुच्छेद 12(3) अनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बैठक कोणत्याही घटनात्मक पदावरील मुख्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीच्या वेळी होणे आवश्यक असते. या बैठकीत बहुमताने निर्णय घेतला जातो. अशा पदांच्या प्रमुखपदी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करायची, याची एक सूची आधी सज्ज केली जाते. या सूचीवर बैठकीत विचार केला जातो. नंतर बहुमताने अधिकाऱ्याची निवड केली जाते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.
गांधी यांची टीका
घटनात्मक पदांवर नियुक्ती करण्यासाठी या तिघांची समिती स्थापन करण्यात आलेली असते. तथापि, अशा समितीमध्ये नेहमीच 2 विरुद्ध 1 असे बहुमत सरकारच्या बाजूने असते. त्यामुळे या बैठकीत विरोधी पक्षनेत्याला आवाज उठविता येत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा या विषयावरील चर्चेत बोलताना केली होती. बुधवारी झालेल्या बैठकीत गांधी यांनी त्यांचे विरोधपत्र सादर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निवडलेल्या नावाला आपला आक्षेप असल्याचे सूचित केले, असे दिसून येत आहे.