कॅन्टोन्मेंट हस्तांतरणासाठी डिसेंबरमध्ये बैठक
3 रोजी आयोजन : मुख्य सचिवांसह जिल्हाधिकारी सहभागी होणार
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी 3 डिसेंबर रोजी ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्ली येथील संरक्षण मंत्रालय पुणे येथील जेओसी कार्यालय, कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव बेळगावचे जिल्हाधिकारी तसेच कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तीन महिन्यानंतर हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याने नागरिकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.
बेळगावसह देशातील 61 कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक नगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. यापूर्वी बेळगाव कॅन्टोन्मेंट हस्तांतरणासाठी अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. नागरी वसाहतींसह बंगलो एरियाही महापालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लावून धरल्याने यासंदर्भात कमिटीही स्थापन करण्यात आली. या कमिटीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मालमत्तांचे सर्वेक्षण करून घेतले. त्याचा अहवाल आहे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दिला आहे.
सप्टेंबर महिन्यापासून हस्तांतरणाच्या हालचाली पूर्णपणे ठप्प होत्या. जिल्हाधिकारी इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनीही बैठक बोलावली नाही. अखेर संरक्षण मंत्रालयाने बुधवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डला पत्र पाठवले असून 3 डिसेंबर रोजी आढावा बैठक घेण्याचे सूचित केले आहे. या बैठकीला संरक्षण मंत्रालय पुणे येथील जेओसी कार्यालय तसेच मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी बेळगावचे जिल्हाधिकारी व कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष व सीईओ उपस्थित राहणार आहेत.