स्थलांतराबाबत आमगाववासियांची घेतली बैठक
खानापूर : भीमगड अभयारण्य क्षेत्रातील दुर्गम भागातील आमगाव गावचे स्थलांतर करण्यासाठी वनखात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि वनखात्याने स्थलांतराबाबत ग्रामस्थांबरोबर यापूर्वी बैठका घेतल्या आहेत. मात्र ग्रामस्थांनी आपल्याला मोबदला आणि योग्य स्थलांतर करून देण्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भीमगड अभयारण्याचे वनाधिकारी नदाफ आणि कर्मचाऱ्यांसह आमगाव येथे शुक्रवारी बैठक घेऊन स्थलांतराबाबत चर्चा केली. यावेळी खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, दीपक कवठणकर, सुरेश जाधव, ईश्वर बोबाटे यासह ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना वन मंत्रालयाने स्थलांतराचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी प्रत्येक कुटुंबाला 15 लाखाचा निधी मिळणार आहे. यासाठी वन मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. मागीलवर्षी एका महिलेला उपचारासाठी तिरडीवरुन 12 कि. मी. चालत आणले होते. त्यानंतर आमगावचा स्थलांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला. जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनीही गामस्थांची बैठक घेऊन स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आमगावात बैठक घेऊन चर्चा केली. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनीही मुख्यमंत्र्यांकडे स्थलांतराबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.