For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभाव्य पुराच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक

10:50 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
संभाव्य पुराच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक
Advertisement

समन्वयाने कार्य करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची लक्षणे आहेत. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, एकमेकांशी समन्वयाने कार्य करून यासाठी तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हा आपत्ती निवारण विभागाची बैठक झाली. अध्यक्षपदावरून बोलताना मनपासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पावसाळ्यासाठी सज्ज व्हावे, बेळगाव शहरासह जिल्ह्यातील धोकादायक झाडे हटवावीत. धोकादायक वीज खांबांचीही दुरुस्ती करावी. विजेच्या तारांना झाडांच्या फांद्या स्पर्श करीत असतील तर खबरदारी म्हणून फांद्या तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात संसर्गजन्य रोगराई वाढण्याची शक्यता आहे. यासाठी आरोग्य विभागाने आतापासूनच जागृतीला सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. पिण्याच्या पाण्याचे वारंवार परीक्षण करावे. ते पिण्यायोग्य असल्याची पडताळणी करूनच पाणीपुरवठा केला जावा. नागरिकांनीही पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. नदीकाठावरील नागरिकांना व वेगवेगळ्या वस्त्यांना  संभाव्य पुराबद्दल जागरुक करावे. पुराची स्थिती निर्माण झाल्यास  शेतकरी जनावरांसह सुरक्षित जागी पोहोचतील, यासाठी जागृती करावी. गळक्या व जीर्ण शाळा इमारती, अंगणवाड्यांमध्ये वर्ग चालणार नाहीत, याची सूचना द्यावी. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ पथकाने तयारीत राहावे. पुराच्या वेळी लागणारी उपकरणे सुस्थितीत आहेत का? याची खात्री करून घ्यावी. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश आदींसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

सज्जता...

Advertisement

संभाव्य पुराच्यावेळी आवश्यक चारा, औषधांचा साठा करावा. जनावरांसाठी गो-शाळा सुरू करण्यासंबंधी स्थळनिश्चिती करावी. पिण्याच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी सज्जता ठेवावी. पावसामुळे रस्ते, वीजखांबांचे नुकसान झाल्यास त्वरित त्यांची दुरुस्ती करावी. लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारीतील तलावांची स्थिती काय आहे? बंधाऱ्यांचे दरवाजे सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

Advertisement
Tags :

.