50 वर्षांनी त्याचवेळी, त्याचठिकाणी भेट
4 मैत्रिणींनी रीक्रिएट केला 5 दशके जुना क्षण
इंग्लंडमध्ये चार मैत्रिणींनी 70 व्या जन्मदिनी स्वत:च्या जुन्या स्मरणीय छायाचित्रातील क्षण पुन्हा जगण्याचा अनुभव घेतला आहे. या मैत्रिणी शालेय जीवनापासून मैत्रीने जोडल्या गेलेल्या आहेत. 1972 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी टॉर्की, डेवोनमध्ये सुटी घालविली होती. 50 वर्षांनी त्यांनी स्वत:च्या 70 व्या जन्मदिनी त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छायाचित्र काढून घेतले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोकांनी त्यांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. मॅरियन बॅनफोर्थ, सुसान मॉरिस, मॅरी हेलिवेल आणि कॅरल एस्ब्रो नावाच्या या चार मैत्रिणी इंग्लंडमधील आहेत. त्यांची मैत्री एका हॉलिवूड शोप्रमाणेच आहे. 1972 मध्ये त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी पुन्हा डेवोन येथे जाणार असल्याचे वचन घेतले होते. सुसान मॉरिस यांच्या सुचनेनुसार त्यांनी हा क्षण पुन्हा छायाचित्राद्वारे टिपला आहे.
कॅरल, मॅरियन, सुसान आणि मॅरी यांनी 1972 मध्ये टॉर्की डेवानमध्ये स्वत:चा पहिला गर्ल्स हॉलिडे एन्जॉय केला होता. तसेच 70 वर्षे वय झाल्यावर पुन्हा एकत्र सुटी साजरी करण्याचा निर्धार केला होता असे या छायाचित्राच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे.
आम्ही तेव्हा किशोरवयीन होतो आणि एका छोट्या कॅरव्हॅनमध्ये राहणे आणि परस्परांचे कपडे शेअर करण्यावरून अत्यंत उत्साहित होतो. इंग्लिश रिवेरामध्ये आईवडिलांशिवाय स्वत:वर निर्भर राहणे अत्यंत अनोखे आणि मोठे झाल्यासारखे वाटत होते असे मॉरिस यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. मॉरिस आता 5 नातवांच्या आजी आहेत.
व्हायरल छायाचित्रात महिलांनी 1972 मधील छायाचित्रासारखेच कपडे परिधान केले होते. परंतु योग्य ठिकाणी निवडणे अवघड होते. जुन्या छायाचित्रात दिसून येणारे पांढऱ्या रंगाचे हॉटेल आता अस्तित्वात नव्हते. यामुळे त्यांना काहीसा त्रास झला. टॉर्की येथून परतल्याच्या काही आठवड्यांनी त्यांनी दोन्ही छायाचित्रे आणि एस्ब्रो यांच्या पतीकडून लिहिण्यात आलेला एक लेख ‘हॅलिफॅक्स कूरियर’ नाच्या स्थानिक वृत्तपत्राला पाठविला. कहाणी प्रकाशित झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.
अत्यंत सुंदर छायाचित्रे आणि सुंदर महिला. तुम्ही चारही महिला स्वत:चा बालपणीचा संकल्प पूर्ण करू शकला हे अत्यंत रोमांचक आहे असे उद्गार एका युजरने काढले आहेत.