स्वातंत्र्यदिन साजरा करण्याबाबत खानापूर तहसीलदार कार्यालयात बैठक
खानापूर : खानापूर तालुक्यात आणि शहरात 15 ऑगस्ट स्वांतत्र्यदिन साजरा करण्यासंदर्भात नियोजन समितीची बैठक येथील तहसीलदार कार्यालयातील सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते. तहसीलदार प्रकाश गायकवाड आणि ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध संघ-संस्था व ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून विविध सूचना करण्यात आल्या. यावेळी प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या खेळाडू व तरुणांचा सत्कार करण्यात यावा, अशी सूचना मांडण्यात आली. तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना मांडण्यात आली. यावर सर्वानुमते तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडाक्षेत्रात योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार हलगेकर म्हणाले की, स्वातंत्र्य दिन हा एक राष्ट्रीय सण असून यात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले आहे. यासाठी सर्वांनी 15 ऑगस्ट हा दिवस देशासाठी अर्पण करावा, असे ते म्हणाले. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले की, 15 ऑगस्ट महात्मा गांधांच्या फोटोबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात यावे. तसेच प्लास्टिक ध्वजावर तातडीने बंदी घालून नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे ते म्हणाले. यावेळी बैठकीला तालुकास्तरीय अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व विविध सेवा संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.