मेदव्हेदेवचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था / दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या ड्युटी फ्री पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचे एकेरीतील आव्हान नेदरलँड्सच्या ग्रिकस्पूरने उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आणले.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 47 व्या मानांकित टेलॉन ग्रिकस्पूरने मेदव्हेदेवचा 2-6, 7-6 (9-7), 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. 2023 साली या स्पर्धेत मेदव्हेदेवने जेतेपद मिळविले होते. आता ग्रिकस्पूर आणि ग्रिसचा सित्सिपस यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. सित्सिपसने इटलीच्या बेरेटेनिचा 7-6 (7-5), 1-6, 6-4 अशा सेटसमध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे कॅनडाच्या अॅलिसीमेने क्रोएशियाच्या मॅरीन सिलीकचा 6-4, 3-6, 6-2 तसेच फ्रान्सच्या अॅलेसने इटलीच्या नेर्डीचा 2-6, 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
भारताच्या युकी भांब्री आणि ऑस्ट्रेलियाचा पॉपरीन या जोडीने दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भांब्री आणि पॉपरीन यांनी ब्रिटनच्या ज्युलीयन कॅश आणि लॉईड ग्लासपूल यांचा 5-7, 7-6 (7-5), 10-5 असा पराभव केला.