मेदवेदेव्ह , सिनेर, स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत
डी मिनॉर, जॅक ड्रेपर, जेसिका पेगुला, बियाट्रिझ हदाद माइया, मुचोव्हा यांचीही आगेकूच, वोझ्नायाकी, पाओलिनी पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
डॅनील मेदवेदेव्ह , जेनिस सिनेर, अॅलेक्स डी मिनॉर, जॅक ड्रेपर, इगा स्वायटेक, जेसिक पेगुला, ब्राझीलची बियाट्रिझ हदाद माइया, कॅरोलिना मुचोव्हा यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जस्मिन पाओलिन, कॅरोलिन वोझ्नियाकी यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
जागतिक अग्रमानांकित व ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जेनिक सिनेरने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 7-6 (7-3), 7-6 (7-5), 6-1 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. सिनेरला संघर्ष करावा लागला असला तरी त्याने काही अप्रतिम फटके मारले आणि बेसलाईनजवळ शानदार खेळ केला. एका मोसमात चारही ग्र्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मान त्यानेही मिळविला. असा पराक्रम करणारा 2000 नंतरचा तो आठवा खेळाडू आहे. जोकोविचने हा पराक्रम एकूण आठवेळा केला आहे. त्याची पुढील लढत डॅनील मेदवेदेव्हशी होईल. यापूर्वी विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत दोघांची गाठ पडली होती आणि मेदवेदेव्हने पाच सेट्सच्या झुंजीत विजय मिळविला होता. पाचव्या मानांकित मेदवेदेव्हने नुनो बोर्जेसचा 6-0, 6-1, 6-3 असा धुव्वा उडवित शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. सुमारे दोन तासात त्याने ही लढत संपवली.
ऑस्ट्रेलियाच्या दहाव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने आपल्याच देशाच्या जॉर्डन थॉम्पसनवर 6-0, 3-6, 6-3, 7-5 अशी मात करीत आगेकूच केली. या मोसमातील त्याचा हा 40 वा टूर लेव्हलवरील विजय आहे. एटीपी फायनल्समध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. त्याची उपांत्यपूर्व लढत ब्रिटनच्या जॅक ड्रेपरशी होईल. ड्रेपरने पहिल्यांदाच पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने झेकच्या टॉमस मॅकहॅकचा 6-3, 6-1, 6-2 असा पराभव केला.
महिला एकेरीत जागतिक अग्रमानांकित व प्रेंच ओपन विजेत्या पोलंडच्या इगा स्वायटेकनेही उपांत्यपूर्व फेरी गाठत सहावे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. तिने रशियाच्या सोळाव्या मानांकित ल्युडमिला सॅमसोनोव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव केला. तिची पुढील लढत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाशी होईल. सहाव्या मानांकित पेगुलाने आगेकूच करताना रशियाच्या डायना श्नायडरचा 6-4, 6-2 असा पराभव केला.
बियाट्रिझ माइयाची ऐतिहासिक कामगिरी
ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने माजी जागतिक अग्रमानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीचे आव्हान 6-2, 3-6, 6-3 असे संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती मारिया ब्युनोनंतरची पहिलीच ब्राझिलियन खेळाडू आहे. मारियाने 1968 मध्ये असा पराक्रम केला होता. तिची पुढील लढत कॅरोलिना मुचोव्हाशी होईल. मुचोव्हाने यापूर्वी 2023 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. 52 व्या मानांकित मुचोव्हाने पाचव्या मानांकित जस्मिन पाओलिनीचे आव्हान 6-3, 6-3 असे सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. पाओलिनी ही प्रेंच ओपन व विम्बल्डनची उपविजेती आहे. मुचोव्हाने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सेट गमविलेला नाही. मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर दहा महिन्यांच्या ब्रेकनंतर यावर्षी जूनमध्ये तिने पुनरागमन केले होते.