विश्व टेनिस लीग स्पर्धेत मेदव्हेदेव, रायबाकिना, बोपन्ना प्रमुख आकर्षण
वृत्तसंस्था/बेंगळूर
भारतामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या विश्व टेनिस लीग स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सहभागी होत आहेत. 17 डिसेंबरपासून येथे सुरू होणाऱ्या विश्व टेनिस लीग स्पर्धेत माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव तसेच 2022 सालातील विम्बल्डन विजेती इलिना रायबाकिना त्याच प्रमाणे भारताचा रोहन बोपन्ना हे प्रमुख आकर्षण ठरतील. बेंगळूरमध्ये विश्व टेनिस स्पर्धा एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियममध्ये खेळविली जाणार असून ती चार दिवस चालणार आहे. पहिली विश्व टेनिस लीग स्पर्धा 2022 साली संयुक्त अरब अमिरातमध्ये झाली होती. तर भारतातील ही चौथी विश्व टेनिस लीग स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने व्यक्त केली आहे.
या स्पर्धेत रशियाचा मेदव्हेदेव, इलिना रायबाकिना, ऑस्ट्रेलियाचा निक किरगॉईस, फ्रान्सचा गेल मोनफिल्स, पाओला बेडोसा, रोहन बोपन्ना, सुमित नागल, युकी भांब्री, अंकिता रैना, श्रीवल्ली भामेदीपती आणि माया रेवती हे सहभागी होत आहेत. रोहन बोपन्नाने अलिकडेच टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पण या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविणार आहे. या स्पर्धेत चार संघ राहतील. स्पर्धेतील सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविले जातील. पुरूष एकेरी, महिला एकेरी आणि दोन दुहेरीच्या लढती होतील. राऊंड रॉबीन टप्पा झाल्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. विश्व टेनिस लीगचा महेश भूपती हा सहसंस्थापक आहे.