मेदव्हेदेव उपांत्य फेरीत, जोकोविच पराभूत
वृत्तसंस्था / शांघाय
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या शांघाय मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा पराभव केला. पण नवोदित व्हॅलेंटिन व्हॅचेरॉटने सर्बियाच्या माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचला पराभवचा धक्का देत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले.
या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मेदव्हेदेवने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. 2019 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर मेदव्हेदेवने पहिल्यांदाच यावेळी उपांत्य फेरीत मजल मारली आहे. आता मेदव्हेदेवचा उपांत्य फेरीचा सामना फ्रांन्सच्या आर्थर रिंडेरकेनिचबरोबर होणार आहे. फ्रान्सच्या रिंडरकेनिचने कॅनडाच्या 12 व्या मानांकीत फेलिक्स ऑगेर अॅलिसीमेचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात उपांत्यफेरीत स्थान मिळविले. दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्हॅलेंटिन व्हॅचेरॉटने माजी टॉपसिडेड जोकोविचचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये सहज फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. 38 वर्षीय जोकोविचला या सामन्यात आपली सर्विस अधिकवेळ राखता आली नाही. या सामन्यानंतर जोकोविचने व्हॅचेरॉटच्या खेळाचे खास कौतुक केले आहे.