For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यम लयीतले संमेलन

06:26 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यम लयीतले संमेलन
Advertisement

पिंपरी-चिंचवडनगरीत पार पडलेले शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्या संमेलन अनेकार्थांनी वैशिष्ट्यापूर्णच म्हटले पाहिजे. एखाद्या संमेलनाच्या यशस्वितेचे मोजमाप करणे, ही तशी अवघड बाब होय. किंबहुना, कलावंत, रसिकांचा सहभाग, उद्घाटन व समारोप सोहळ्याबरोबरच परिसंवाद व इतर कार्यक्रमांमध्ये घडून आलेली गांभीर्यपूर्ण चर्चा, यातून आपल्याला त्या-त्या संमेलनाच्या सकसतेबाबतचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कलाकार व नाट्या रसिकांच्या सहभागाच्या स्तरावर या संमेलनास नक्कीच ‘अ’ श्रेणी द्यावी द्यागेल. तथापि, राजकारण्यांनी एकूणच व्यासपीठाचा व भाषणबाजीचा व्यापलेला अवकाश अन् संमेलनाध्यक्ष व त्यांच्या भाषणाची झालेली कुचंबना बघता संमेलनाला नाट्यापेक्षा राजकीय नाट्यात अधिक रस आहे की काय, असा प्रश्न कुणासही पडावा. अखिल भारतीय नाट्या परिषदेच्या अध्यक्षपदाची कमान प्रशांत दामले यांच्याकडे आहे. दामले यांनी नाट्या संमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी असते, असे वर्णन केले. बहुदा त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या उत्सवात मनसोक्त राजकीय फुलबाजे उडविले असावेत. मागच्या अनेक वर्षांपासून साहित्य वा नाट्या संमेलनात उद्घाटक, स्वागताध्यक्ष वा तत्सम जबाबदाऱ्या शरद पवार हे पार पडत आहेत. असे असले, तरी संमेलनातील आपले भाषण साहित्य, संस्कृती, कला यावर कसे केंद्रित राहील, यावर पवार यांचा कटाक्ष असतो. स्वागताध्यक्ष या नात्याने पवार यांनी व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनाबाबत मतमतांतरे होऊ शकतात. किंबहुना, आपल्या मनोगतात त्यांनी मराठी नाटक, त्याचे स्थित्यंतर व एकूण नवीन आव्हानांचा घेतलेला परामर्ष त्यांचे याविषयीचे गांभीर्य दाखवून देते. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलावे? आजवरच्या इतिहासात महाराष्ट्राला लाभलेले ते सर्वांत धाडसी मुख्यमंत्री ठरावेत. आपल्या धाडसी प्रयोगाबद्दल ते नेहमी मुक्तपणे फटकेबाजी करतात. दीड वर्षांपूर्वी केलेल्या आपल्या या प्रयोगाची इतिहासात नोंद होण्याचाही त्यांना कोण विश्वास वाटतो. या कथानकाला चित्ररूप द्यावे, ही त्यांची अपेक्षा डॉ. जब्बार पटेल पूर्ण करतील काय, हे माहीत नाही. पण, या साऱ्या गोष्टी मनोरंजकच. त्यामुळे वेगळा ‘पॅटर्न’वाल्या दिग्दर्शकांनी तरी पार्ट 3 चा विचार करायला हरकत नाही. पहिला अंक सत्ता बदलाचा, दुसरा राज्याच्या विकासाचा, तर तिसरा अंक आमच्या विजयाचा असेल, असे सांगायलाही महाराष्ट्राचे नेतृत्व विसरत नाही. इतक्या अल्प कालावधीत त्यांनी आत्मसात केलेली ही नाटकीय भाषा त्यांच्या एकूणच या स्तरावरील गतिमानतेचे लक्षण मानता येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष नेते म्हणून ओळखले जातात. अभ्यासपूर्ण व सखोल मांडणी, हे त्यांचे वैशिष्ट्या होय. त्यांनीही आपल्या भाषणात केलेली नाट्याविषयक चर्चा महत्त्वपूर्ण होय. ‘कट्यार पाठीत घुसली,’ ही सल किंवा ‘आता होते, गेले कुठे,’ हा पलटवार किंवा ‘राजकारणात नाटके करणाऱ्यांना लोक घरी बसवतात,’ हा सारा शब्दसांभार एखादा नाटकाच्या संवादाच्या तोडीचाच ठरतो. भले जनतेच्या कोर्टात अद्याप निकाल लागायचा असेल. पण, कशा पद्धतीने राजकीय नेपथ्य तयार केले जाते, हे नाटकवाल्यांनीही शिकण्यासारखे आहे.  मुळात साहित्य वा नाट्या संमेलन ही अभिव्यक्तीची माध्यमे आहेत. त्यावर राज्याच्या हिताच्या दृष्टीने चर्चा, ऊहापोह होण्यात काहीच गैर नाही. मग एखाद्याच्या प्रकृतीवरून खिल्ली उडविण्यात तरी वावगे काय? आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्टा लागत नाही, या वाक्याला एकदा ‘सिंहासन’ चित्रपटाची जोड देऊन टाकली, की कामच होऊन जाते. खरे तर राजकीय जीवनात इतकी व्यग्रता असूनही राजकारणी मंडळी नाटकाचा किती अभ्यास करतात, याचेही हे द्योतक. त्या अर्थी आमचा अभिनय 3 तासांचा, तुम्ही 24 तास नाटके करतात, ही प्रशांत दामलेंची टिप्पणी समर्पकच. तसा आजचा काळ परस्परांवरील प्रभावाचा. त्यामुळे राजकारण्यांवर नाटकवाल्यांचा व नाटकवाल्यांवर राजकारण्यांचा प्रभाव पडत असल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. आपण कमी नसल्याचे तसे नाट्या परिषदेतील मंडळींनी वेळोवेळी दाखवून दिले आहेच. मी नाट्या परिषदेचा अध्यक्ष झालो नि मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटले, ही दामलेंच्या मनीची भावनाही कधी राजकीय वळणाला जाते, हे त्यांचेच त्यांना कळाले नसणार. त्यावर ‘आमच्याकडे असे झाले असते, तर बऱ्याच अडचणी सुटल्या असत्या,’ ही फडणवीसांची प्रतिक्रियाही ‘विनोदी’च. डॉ. जब्बार पटेल यांच्यासारखा प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष शंभराव्या संमेलनाला लाभला, हे भाग्यच. मात्र, ते व त्यांचे भाषण या राजकीय फुलबाज्यांमध्ये झाकोळूनच गेले. नाट्या संस्था, त्यातील वेगवेगळे विषय, विद्यार्थी व एकूण कलावंतावर लादलेली सेन्सॉरशीप यावर त्यांनी मांडलेली मते महत्त्वाचीच. राज्यकर्त्यांनो आम्हाला म्हणायचे ते म्हणू द्या, हे त्यांचे विधान मीडियासह कुणालाच ऐकू जाऊ नये, हा आजच्या काळाचा महिमाच. बाकी मंत्रालयातील विलंबित लयीवर त्यांनी संयत शब्दात केलेली टीका व सांस्कृतिकमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी इंजेक्शन देण्याचे दिलेले आश्वासन द्रुत लयीच्या दिशेने जाणारे. राज ठाकरे यांची मुलाखत तशी काठाकाठानेच झाली. टोपण नावे आणि परस्परांचा आदर याची त्यांनी घातलेली सांगड सर्वांनाच पटेल, असे नाही. पण, आपल्या आवडत्या नेत्याने अशी आचारसंहिता आखून दिल्यानंतर कलावंत पुढची गोष्ट लक्षात घेणार का, की ज्याचा त्याचा प्रश्न समजून दुर्लक्ष करणार, हे काळच ठरवेल. बाकी बालनगरी, परिसंवाद व नाटके उत्तमच. त्या अर्थी संमेलन मध्यम लयीत झाले, असे म्हणुयात.

Advertisement

Advertisement
Tags :

.