For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैद्यकीय साहाय्यता निधी योजना सुरूच राहणार!

11:14 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
वैद्यकीय साहाय्यता निधी योजना सुरूच राहणार
Advertisement

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांची माहिती : ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : रुग्णसेवा ही ईश्वरसेवा म्हणून ओळखली जाते. सीमाभागातील 865 गावांमधील नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी योजना सीमाभागासाठी सुरू केली. परंतु, कानडी संघटना तसेच जिल्हा प्रशासनाकडून विरोध केला जात आहे. परंतु, कोणतीही जात, धर्म, भाषाभेद न करता रुग्णसेवा केली जात आहे. त्यामुळे विरोध असला तरीही मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी योजना सीमावासीयांना सुरूच राहील, अशी ठाम प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. कन्नड संघटना व जिल्हा प्रशासनाने आरोग्यसेवेला विरोध दर्शविल्यानंतर रविवारी म. ए. समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंगेश चिवटे यांच्यासोबत चंदगड येथील इनाम सावर्डे येथे बैठक पार पडली. बैठकीमध्ये मागील आठवड्यात आरोग्यसेवेवरून झालेल्या गोंधळाची चिवटे यांनी माहिती घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सीमा समन्वयमंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांतदादा पाटील तसेच उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून सीमाभागातील 865 गावांना वैद्यकीय साहाय्यता निधी योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सीमाभागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू आहे. परंतु, काही कानडी संघटना तसेच जिल्हा प्रशासनाकडून विरोध होत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय साहाय्यता कक्षालाही शनिवारी आरोग्य विभागाने टाळे ठोकले. केवळ सूडबुद्धीने हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती समिती नेत्यांनी दिली.

...अन्यथा आम्हीही विचार करू

Advertisement

महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजना बेळगावमधील केएलई हॉस्पिटलमध्ये लागू आहे. त्यामुळे कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल या परिसरातील नागरिकांना उपचार घेणे सोयीचे ठरते. याबरोबरच मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी योजनेतून केएलई व अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. तर कर्नाटक सरकारची ‘कर्नाटक वाजपेयी आरोग्य योजनें’तर्गत सांगली, मिरज, सोलापूर, नांदेड, लातूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जातात. कर्नाटक सरकारने जर महाराष्ट्रातील योजनांना असाच विरोध दर्शविलाच तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशाराही मंगेश चिवटे यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. आरोग्यसेवा दिली जात असल्याने प्रशासनाने विरोध बाजूला करून नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवांचे स्वागत करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी चंदगड येथील भाजपचे पदाधिकारी शिवाजी पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रणजित चव्हाण-पाटील, सागर पाटील, आनंद आपटेकर, शंकर बाबली, महादेव पाटील, अमित जाधव यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

ऑनलाईन अर्ज करण्यावर देणार भर

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीसाठी सीमाभागातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केल्यास तो स्वीकारला जाणार आहे. वैद्यकीय साहाय्यता निधीच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी अर्ज करावयाचे आहे. कोणतीही समस्या आल्यास साहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले आहे.

26 जानेवारीनंतर मुंबईत बैठक

म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत घडलेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीसाठी 26 जानेवारीनंतर मुंबई येथे व्यापक बैठक बोलाविली जाणार असून यामध्ये सीमाभागातील नागरिकांना साहाय्यता निधी मिळण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.