पावसाची शक्यतेमुळे उपाययोजना
आसाममध्ये येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉन्सून ईशान्य भारतात पोहचला असल्याने मुसळधार पाऊस होणे शक्य आहे. अशा स्थितीत 4 जूनला होणाऱ्या मतगणनेत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, म्हणून आसाममध्ये विषेश उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग गोयल यांनी दिली.
पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता गृहित धरुन जनरेटर्स आणि इन्व्हर्टर्स मतगणना केंद्रांना पुरविण्यात आले आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यायी इंटरनेट व्यवस्थाही केलेली असल्याने मतगणना प्रारंभापासून शेवटपर्यंत सुरळीत पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आवश्यकतेनुसार इतर उपाययोजना करण्यात येतील. पर्यायी व्यवस्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.