‘अर्थपूर्ण’ भेटीगाठी अन् गुप्त यंत्रणा गतीमान
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिह्यात काही विधानसभा मतदारसंघातील ताकदीच्या बंडखोर उमेदवारांचा अपवाद वगळता सर्व मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा चुरशीचा सामना रंगला आहे. गेल्या पंधरा दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहीर प्रचारसभा, मेळावे, कोपरा सभा, पदयात्रा, प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. सोमवारी जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा, मोटरसायकल रॅलीद्वारे नेत्यांसह उमेवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आता जाहीर प्रचार थंडावला असला तरी छुपी रणनिती सुरु आहे. मतदारांपर्यंत सर्व यंत्रणा पोहोचवण्यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांकडे सर्वतोपरी जबाबदारी सोपवली आहे. यंत्रणा सांभाळणाऱ्या या कार्यकर्त्यांकडून मतदारयादी निहाय मतदारांची ‘अर्थपूर्ण’ भेट घेतली जात आहे.
प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात महाविकास आघाडी व महायुतीचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा धुरळा उडला. प्रचारसभा, पदयात्रा, रोडशो, प्रत्यक्ष गाठीभेटी, कोपरा सभांनी सोमवारचा दिवस गाजला. महिनाभरापासून सुरु असलेला जाहीर प्रचारास पूर्णविराम मिळाला असला तरी आता छुप्या भेटीगाठी अन् फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे. वैयक्तिक गाठीभेटी, अंतर्गत बैठका सुरु झाल्या आहेत. बुधवारी मतदान होत असल्यामुळे एक-एक मतदान आपल्याच पारड्यात कसे पडेल यासाठी उमेदवारांनी व्यूहरचना आखली आहे. मंगळवारी दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यत गुप्त प्रचाराचे खलबते सुरुच होते.
एक-एक मतासाठी ताकद पणाला
जिह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत असल्यामुळे एक एक मत महत्वाचे ठरले आहे. उदेवारांपेक्षा नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष कोल्हापुरातील राजकीय घडामोडींकडे लागले आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ या आवेशातून महाविकास व महायुतीचे नेते, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते ताकदीने प्रयत्न करत आहेत.
वैयक्तिक आरोप, प्रत्यारोपांनी आठवडा गाजला
प्रचार सुरु झाल्यापासून नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांवर अनेक आरोप करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: प्रत्यक्ष उमेदवारांऐवजी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील व भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी एकमेकांचे वाभाडे काढत प्रचारसभा गाजवल्या. जाहीर प्र्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात तर वैयक्तीक आरोप करण्यात आले. त्यामुळे गेला आठवडा नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. आता जाहीर प्रचार थांबला असला तरी अंतर्गत प्रचार, कुरघोडीचे राजकारणास वेग आला आहे. मतदारांना अमिष दाखवून मतदान आपल्याच पारड्यात कसे पडेल यासाठी प्रयत्न सुरु आहे. सोशल मीडिया आणि फोनचा वापर देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.
विरोधकांच्या हालचालींवर लक्ष
जाहीर प्रचार थांबला असला तरी अंतर्गत प्रचार, कुरघोडीचे राजकारणास वेग आला आहे. मतदारांना अमिष दाखवून मतदान आपल्याच पारड्यात कसे पडेल यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डोळ्यात तेल घालून विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
परगावच्या मतदारांना आणण्यासाठी विशेष व्यवस्था
नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगाच्या माध्यमातून जिह्यातील अनेक लोक परजिह्यात अथवा परराज्यात स्यायिक झाले आहेत. पण त्यांच्या मतदानाची नोंद शहरासह जिह्याच्या ग्रामीण भागात आहे. अशा मतदारांशी संपर्क साधून आपल्यालाच मतदान करावे यासाठी उमेदवारांकडून विनंती केली जात आहे. अशा मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवारांकडून वाहनांची विशेष व्यवस्था तैनात केली आहे. त्यापैकी दूरच्या अंतरावरील अनेक मतदार मंगळवारी दुपारपर्यंत त्यांच्या गावी पोहोचले आहेत.