महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निकालाचा अन्वयार्थ

01:05 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील चार जागांवरील निवडणुकीचा सामना बरोबरीत सुटल्याचे दिसून येते. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या असल्या, तरी मुंबईकरांनी महायुतीला दिलेला दणका नजरेआड करण्यासारखा नाही. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पानिपत झाले. भाजपा शिंदे गट युतीला 48 पैकी केवळ 16 जागा जिंकता आल्या. तर मुंबईत 6 पैकी केवळ दोन जागांवर युतीस समाधान मानावे लागले. त्यामुळे मुंबईतील त्यांचे अपयश व उद्धव सेनेचे यश हा योगायोग नव्हता, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले. लोकसभेत ठाकरेसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई अशा तीन जागा जिंकल्या होत्या. तर उत्तर पश्चिम मुंबईच्या एका जागेवर त्यांना अवघ्या 48 मतांनी पराभव पत्करावा लागला. हे प्रकरण सध्या न्यायालयापर्यंत गेले असून, या निकालाबद्दल एकूणच शंकाकुशंका व्यक्त केल्या जातात. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही विजयाची मशाल धगधगणे ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी उत्साहवर्धक बाब ठरावी. मुंबई आणि शिवसेना हे काही दशकांपासूनचे समीकरणच मानले जाते. मात्र, सेनेची दोन शकले झाल्यानंतर मुंबईकर कुणाला कौल देणार, याबाबत प्रश्नचिन्ह होते. तथापि, लोकसभेत खरी शिवसेना कोणती, याचे उत्तर मुंबईकरांनी दिले. त्यानंतर विधान परिषदेतही हाच ट्रेंड कायम राहिल्याने युतीपुढच्या अडचणी वाढलेल्या दिसतात. वास्तविक मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेचे मागच्या 30 वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. या खेपेलाही सेनेकडून पक्षाचे नेते अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाने किरण शेलार यांना मैदानात उतरवून जोरदार फिल्डिंग लावली खरी. परंतु, पदवीधरांचा कल ठाकरेसेनेकडेच राहिल्याचे दिसते. हा भाजपासाठी मोठा धक्का म्हटला पाहिजे.  मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे व ठाकरे सेनेचे ज. मो. अभ्यंकर यांच्यात पंचरंगी लढत झाली. तेथे महायुतीमध्ये बेबनाव, तर महाविकास आघाडीमध्ये एकी दिसून आली. त्याचा फायदा अभ्यंकर यांना झाल्याचे निकाल सांगतो. खरे पाहता या चार जागांपैकी संपूर्ण राज्याचे लक्ष होते ते मुंबईच्या या दोन जागांवर. परंतु, तेथेच ऐन विधानसभेच्या तोंडावर युतीला पराभव पत्करावा लागणे, ही धोक्याची घंटाच मानायला हवी. दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात मात्र चुरशीच्या लढतीत शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी बाजी मारली. हे पाहता शिंदेंनीही आपले मिशन तडीस नेले, असे म्हणता येईल. अर्थात नाशकात शिंदेंना भाजपाचे सहकार्य मिळाले, हे यातून स्पष्ट होते. परंतु, मुंबई शिंदे गटाचे भाजपास पाठबळ मिळाले का, हा प्रश्न उरतोच. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला माफक यश मिळाले, ते भाजपाची मते मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे एकवटल्याने. पण शिंदे गटाच्या कोट्यातील मते त्याप्रमाणात वळलेली दिसली नाहीत. विधान परिषदेतही तेच होत असेल, तर याचा भाजपाला गांभीर्याने विचार करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदाचा फायदा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपाने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची विश्लेषकांकडून केली जाणारी मांडणी चुकीची ठरू नये. लोकसभेत उद्धव सेना व शिंदे सेना अनुक्रमे 9 व 7 जागा मिळवितात. विधान परिषदेत अनुक्रमे 2 व 1 जागांवर यश प्राप्त करतात. या निकालाचा अर्थ काय घ्यायचा? फुटल्यानंतरही सेना दुबळी होण्याऐवजी वाढावी आणि भाजपाचा अवकाश मात्र कमी व्हावा, हे काही भाजपासाठी चांगले लक्षण ठरू नये. म्हणूनच या निकालाचा अन्वयार्थ लावणे क्रमप्राप्त ठरते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाचे राज्याचे नेतृत्व आहे. फडणवीस यांनी वेळोवेळी भाजपाला यश मिळवून दिले आहे. मात्र, त्यांच्याऐवजी शिंदेंकडे राज्याची धुरा सोपवण्याची खेळी भाजपासाठी मारक ठरत असेल, तर अशा धक्कातंत्री राजकारणापासून बोध घेणे क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ शिंदे व दादा गटावर विसंबून राहून चालणार नाही. हे दोन्ही पक्ष उपयोगशून्य ठरत असतील, तर त्यांना अधिकच्या जागा देणेही पक्षाकरिता घातक ठरू शकते. फडणवीस यांना  हे पक्षश्रेष्ठींना पटवून द्यावे लागेल. मागच्या काही दिवसांत शिंदे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आगामी काळात ते कशा पद्धतीने प्रतिशह देतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. भाजपाने एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यामुळे युती एकत्रित निवडणूक लढविणार, हे निश्चितच आहे. मात्र, जागावाटपात रासप, प्रहार, आरपीआय यांसारख्या पक्षांनाही सामावून घेण्याचा चाणाक्षपणा दाखवावा लागेल. तसे करणे, हे नक्कीच भाजपासाठी लाभदायक ठरू शकते. तिकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी मिळविलेला विजय मात्र पक्षासाठी दिलासाच. मात्र, काँग्रेस उमेदवाराला मिळालेली मते पाहता नाना, विश्वजित आदी मंडळींचा राग ठाकरेसेनेने या निवडणुकीत काढला तर नाही ना, असे म्हणायला वाव आहे. लोकसभेत काँग्रेसला यश मिळाले, हे खरेच. पण, नेतृत्वहीन काँग्रेसला ठाकरेंच्या राज्यातील प्रभावाचा फायदा झाला, हे या पक्षातील सूज्ञ मंडळी जाणतात.  काँग्रेसच्या युवा नेतृत्वाकडे ही समज नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच आगामी विधानसभेत त्याचे वेगळे परिणाम दिसले, तरी आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. पुढच्या टप्प्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीचीही लगबग सुरू झाल्याचे दिसून येते. ही निवडणूक बिनविरोध होणार की येथेही महाविकास आघाडी व महायुतीत टक्कर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article