For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी पंतप्रधान पण काळ बदलू लागला

06:59 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी पंतप्रधान पण काळ बदलू लागला
Advertisement

काळ बदलतो. सरकारे बदलतात. एका पक्षाचे सरकार जाऊन आघाडीचे सरकार येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे बहुमत हुकल्याने रालोआच्या घटक पक्षांच्या बरोबर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरे सरकार स्थापण्यात आले. पण ‘काहीही बदललेले नाही’ असे दाखवण्याचा अट्टाहास पंतप्रधानांनी सुरु ठेवलेला आहे. ‘मी पूर्वीचाच तो आहे’ असे सांगण्याचा जाणूनबुजून प्रयत्न ते करत आहेत. आपल्या पासंगालाही कोणी पोहचलेला नाही आणि कोणाची पोहचण्याची लायकीही नाही अशीच त्यांची कृती आणि देहबोली सांगत आहे. हे सारे किती बरोबर अथवा किती फसवं हे ज्याचे त्याने ठरवावे.

Advertisement

पण गेल्या आठवड्यात ज्याप्रकारे काही घटना घडल्या त्याने काळ बदलू लागला आहे, याची सुगबुग लागली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जगातील अति श्रीमंतांपैकी एक गणले जाणारे मुकेश अंबानी यांनी दहा वर्षात कधी नव्हे ती आपली गाडी दहा जनपथकडे वळवली. सोनीया गांधी यांची एक तास भेट घेतली. ‘जिकडे सरशी, तिकडे पारशी’ हे ठरलेले आहे. विरोधी पक्षांची इंडिया आघाडीला भाजपच्या 240 च्या बरोबरीने जागा मिळाल्या आहेत ही बातमी गुप्त राहिलेली नाही.

येत्या 12 तारखेला मुकेशभाईंचा मुलगा अनंत याचे लग्न आहे. त्याचे निमंत्रण द्यायला ही भेट होती असे सांगितले जात आहे. या बैठकीचा फोटो देखील कोठे बाहेर दिसला नाही. मात्र या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोकसभेत 99 जागा मिळवून काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळवले आणि त्याची नोंद देशाच्या उद्योगजगताने घेतली असा या भेटीचा अर्थ आहे. व्यापारी माणसांचे असेच असते. ते एका करंडीत सारी अंडी ठेवत नाहीत. गेली दहा

Advertisement

वर्षे त्यांना केवळ मोदींचीच करंडी भरवशाची वाटत होती. लोकसभेच्या निकालानंतर तसे राहिलेले नाही. अंबानी हा उद्योगसमूह इंदिरा गांधी

पंतप्रधान असताना उदयाला आला होता हे विसरून चालणार नाही.

राजकीय भाषेत सांगायचे म्हणजे काँग्रेसचे ‘दुकान’ परत एकदा सुरु झाले.’गेल्या 10 वर्षात गांधी घराणे जीवंत आहे की नाही हे विचारायला कोणा

औद्योगिक घराण्याला सवड नव्हती. राहुल गांधी यांनी गौतमभाई अदानी आणि त्यांच्या उद्योगसमूहाबाबत आघाडी उघडलेली असताना मुकेशभाईंनी त्यांच्याशी शिळोप्याच्या गप्पा खचितच मारल्या नसतील. उद्योगजगतात अंबानी आणि अदानी हे स्पर्धक आहेत. जेव्हा आघाडीचे सरकार असते तेव्हा उद्योगपती सरकार आणि विरोधी पक्षात समतोल साधत असतात. त्यांना त्यांचे हितसंबंध महत्त्वाचे असतात.

अंबानी यांचे सल्लागार म्हणून बराच काळ काम केलेले प्रख्यात लेखक आणि देव-देवतांचे अभ्यासक देवदत्त पटनाईक यांनी मुकेशभाईंना ‘गरुडदृष्टी’

आहे.पुढील दहा-पंधरा वर्षात कशा प्रकारे प्रगती होईल याची जाण त्यांच्याकडे एव्हढी आहे की इतरांना सुगावा लागण्याच्या अगोदरच ते उदयमान क्षेत्रात पूर्ण तयारीनिशी हजर असतात व इतरांच्या दसपट कमावतात असे पटनाईक यांनी एका मुलाखतीत सूचित केले होते. मुकेशभाईंना राजकारणातील ‘गरुडदृष्टी’ नसती तर ते खचितच ‘नंबर एक’ राहिले नसते व अदानी बरोबर मोदींचे खासमखास राहिले नसते.

गेल्या आठवड्यात केंद्राला टेकू देणाऱ्या तेलगू देशमचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्याकडे ज्या विविध मागण्या केलेल्या आहेत त्याने एकीकडे ते केंद्राला समर्थन देण्याचे विविध प्रकारे पूर्ण वसूल करणार हे ठरलेले दिसत आहे. एका मर्यादेबाहेर आंध्र आणि बिहारला फायदा झाला तर इतर राज्यात त्याची प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. चंद्राबाबू आपल्या कामाची किंमत जितकी जास्त उकळणार तेव्हढा बोभाटा होणार. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रे•ाr यांनी मोदी-शहा यांना भेटून आंध्र प्रदेशच्या विभाजनामुळे त्यांच्या राज्याचे कसे नुकसान होत आहे हे रडगाणे गायिले आहे. कालपर्यंत भाजपचा अघोषित मित्र पक्ष असलेला बिजू जनता दल हा ओडिशामधील सत्ता गेल्यानंतर पूर्णपणे भाजपविरोधी झाला आहे. संसदेतील त्याचे 9-10 राज्यसभा सदस्य ओडिशाला विशेष पॅकेजसाठी आंदोलन करू लागले आहेत.

महाराष्ट्र आणि हरयाणामधील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांविषयी भाजप साशंक असल्याने त्याबरोबरच बिहारमधील निवडणूका अगोदर घेण्याचा डाव मोदी-शहा खेळणार काय? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झालेली आहे. आजारी असलेल्या नितीश कुमार यांच्या कलाने घेत घेत त्यांना निवडणूका वर्षभर अगोदर घेण्याचा चंग भाजपने बांधलेला आहे असा संशय लालू यादव यांनी नुकताच व्यक्त केला आहे. भाजपला आपल्या नेत्याला बिहारमध्ये मुख्यमंत्री करण्याची घाई झालेली आहे पण हे सारे नितीश यांना न दुखावता त्यांना करावयाचे आहे असे बोलले जाते. राजस्थानमधील सर्वात जेष्ठ मंत्री किरोरीलाल मीना यांनी दिलेला राजीनामा म्हणजे राज्य भाजपमधील बंडाची सुरुवात आहे असे बोलले जाते. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे सहा आमदार अचानक मध्यरात्री काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत.

लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांनी जे पहिले भाषण संसदेत केले त्याने सत्ता पक्षाची झोप उडवली असे बरेच राजकीय जाणकार मानतात.

त्यांनी आपल्या भाषणात चौफेर टोलेबाजी करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो केले. मोदींखालोखाल सर्वात शक्तिमान अशी ज्यांनी स्वत:ची प्रतिमा बनवली आहे त्या गृहमंत्री अमित शहा यांनादेखील ‘आम्हाला संरक्षण द्या’ असे लोकसभा अध्यक्षांना म्हणावे लागणे म्हणजे काहीतरी अघटितच. पंतप्रधानांसह चार मंत्र्यांनी राहुल यांना त्यांच्या भाषणाच्या वेळी बोलणे म्हणजे मिरची झोंबल्याचा’ प्रकार. पंजाबमधील एका हुतात्मा झालेल्या अग्निवीराची कहाणी राहुल यांनी लोकसभेत सांगितली व त्या जवानांच्या परिवाराला सरकारने काहीच मदत केलेली नाही असा दावा केला. त्यावर वाजलेले वादळ शमण्याचे नाव घेत नाही. तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सरकार अशा परिवारांना एक कोटी रुपये

देते असा प्रतिदावा केला त्यावर राहुल खोटे बोलत आहेत, असा आरोप भाजपकडून केला गेला.

राहुल यांनी सर्व गोष्टी बरोबर केल्या असे नाही. ते गाजलेले संसदपटू नाहीत. या नवीन जबाबदारीचा त्यांना अजून पूर्ण आवाका आला आहे अथवा कसे ते काळ ठरवेल. नवखेपणाकडे कधीकधी डोळेझाक करावी लागते. समज द्यावी लागते. आता राहुल यांच्यावर कारवाई करण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे असे दिसू लागले आहे. त्यांच्याविरुद्ध नोटीस दिली गेली आहे. पण हे सारे प्रकरण हक्कभंग समितीकडे न पाठवता काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. किती बरोबर अथवा चूक ते लवकरच दिसणार आहे. लोकसभा अध्यक्षांची आता अजूनच परीक्षा आहे. काळाबरोबर बदलले नाही तर तुमच्या हातून चुका होतात. घोडचुका होतात. तुम्ही काय करत आहात हे तुम्हालाच कळत नाही. गेल्या लोकसभेत कोणत्यातरी थातुरमातुर प्रकरणात राहुल यांचे सदस्यत्व घालवून मोदी सरकारने स्वत:लाच अडचणीत आणले होते. अशातच केंद्र सरकार हे फार कमजोर आणि लेचेपेचे झाले आहे असे सांगून ते येत्या

ऑगस्टमध्ये पडू शकते असे भाकीत लालू यादव यांनी केलेले आहे. भाजपला आघाडी सरकार म्हणून सत्तेत येऊन 1 महिना झाला अजून 59 राहिलेत. पण ज्या नाटकीय पद्धतीने जे सारे चालले आहे त्याने सरकार आणि विरोधकांत वाढता संघर्ष दाखवतो. सामोपचाराने काम झाले नाही तर महाभारत घडते हा इतिहास आहे. ‘मागील अंकावरून पुढे चालू’ हा प्रकार लोकशाहीलाच घातक आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.