For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव (वित्त) वर्षाची अर्थगुढी

06:30 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव  वित्त  वर्षाची अर्थगुढी
Advertisement

नववर्षाचा प्रारंभ आणि नवे आर्थिक वर्ष यामध्ये आपण वित्तीय नियोजन (फायनान्स प्लानिंग) याची जोड दिल्यास सुबत्ता, स्थिरता आणि आनंदपूर्ण, आरोग्यदायी जीवन जगणे शक्य होईल. यासाठी प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येकजण अर्थसाक्षर होणे, वित्तीय नियोजन करणे ही पूर्वअट ठरते. गेल्या दोन दशकात रोजगार, उत्पन्न, खर्च प्रमाण यात फार मोठे बदल झाले असून गुंतवणुकीची साधने व तंत्रे बदलली आहेत. याबाबत आपले अज्ञान, आळस भविष्यकाळात आर्थिक संकटाची पेरणी ठरते. त्यासाठी प्रथम अर्थसाक्षर होणे व त्याचा वापर करून आपल्या कुटुंबाचा कालबद्ध आराखडा तयार करणे महत्त्वाचे ठरते. अर्थसाक्षरता याचा अर्थ आपली आर्थिक साधने, संपत्ती आपल्या गरजानुसार कार्यक्षमपणे वापरणे, नव्या संधीचा अभ्यासपूर्ण वापर करणे व आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असा होतो. केवळ आपणासारख्या कमी उत्पन्न गटातील  देशातच नव्हे तर अगदी प्रगत, उच्च उत्पन्न गटातील देशातही अर्थ निरक्षरता,  मोठ्या प्रमाणात असून, वित्तीय नियोजनाचे प्रमाण तर फारच अत्यल्प आहे.

Advertisement

पारंपरिक मानसिकता, नव्या संधीचे अज्ञान व गैरसमज यातून झालेले नुकसान टाळण्यासाठी निदान या नववर्षापासून अर्थपूर्ण संकल्प स्वीकारुन आपले कुटुंब भविष्यकाळात येणाऱ्या सर्व आर्थिक संकटांना, अडचणींना यशस्वीरीत्या, सक्षमपणे तोंड देऊ शकेल. अर्थसाक्षरतेत आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे ही पहिली पायरी असून प्रवासाला निघताना कुठे जायचे, कधी जायचे व कसे जायचे हे आपण ठरवतो. त्याप्रमाणेच आपल्या कुटुंबात येणाऱ्या वर्षात, पुढील 5 वर्षात तसेच पुढील 10 ते 15 वर्षात कोणती आर्थिक आव्हाने किंवा खर्च येणार आहेत. याचा पूर्वअंदाज करून त्यासाठी योग्य तरतूद क्षमतेनुसार करावी लागते. काही खर्च हे अचानक उदभवणारे असतात तर काही नियमितपणे येणारे व वाढणारे असतात. त्याबाबत योग्य प्रमाणात तरतूद नसेल तर मोठे आर्थिक संकट येऊ शकते.

आर्थिक किंवा वित्तीय नियोजनाची सुरुवात आपल्या उत्पन्नाचे मार्ग, खर्चाचे प्रमाण व सध्या असलेले नेटवर्थ किंवा मालमत्ता मूल्य यापासून करावे लागते. प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न व खर्च प्रमाण जरी भिन्न असले तरी उत्पन्न फक्त एकाच मार्गाने येते का विविध मार्गाने येते हे महत्त्वाचे ठरते. जर उत्पन्न एकाच मार्गाने येत असेल तर भविष्यकाळात अडचण येऊ शकते. यासाठी उत्पन्न अनेक मार्गे येणे अधिक योग्य ठरते. उत्पन्नातील निश्चितताही तेवढीच महत्त्वाची ठरते. येणारे उत्पन्न हे खर्चापेक्षा अधिक असेल तर थोडी बचत शिल्लक राहते. पण खर्च अधिक व उत्पन्न कमी असल्यास कर्जबाजारीपणाकडे वाटचाल होते. ही भविष्यकालीन आपत्ती टाळण्यासाठी सध्या उत्पन्नातून खर्च जाता जी शिल्लक राहते ती बचत असे न करता उत्पन्नातून प्रथम बचत (साधारण 30 टक्के) बाजूला ठेवून उर्वरीत उत्पन्नात खर्च भागवणे हे अधिक शहाणपणाचे ठरते. आपल्या कुटुंबाचे उत्पन्न, खर्च, कर्ज, गुंतवणूक याबाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतर आपण आता आर्थिक नियोजनाचा दुसरा टप्पा पाहू.

Advertisement

भविष्यकाळात आजारपण, अपघात, मिळवत्या व्यक्तीचा मृत्यू अशा संकटास तोंड देण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपली पहिली जबाबदारी ही अशा संकटास तोंड देण्यास पुरेसे विमा संरक्षण घेण्याचे असते. आपल्या जीविताचे, आरोग्याचे रक्षण करणारी आयुर्विमा पॉलिसी घेणे, घर, गाडी व इतर मालमत्तेचा सर्वसाधारण विमा घेणे ही अत्यावश्यक बाब ठरते. याबाबत योग्य विमा व पुरेसा विमा या दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमा हे संरक्षण कवच असून ते गुंतवणुकीचे साधन, कर वाचवण्याचे साधन म्हणून वापरणे हे चुकीचे ठरते. कोणत्याही आर्थिक संकटातून मी व माझे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित असेल असा सर्वंकष विमा असणे आवश्यक आहे. आता असलेला विमा योग्य व पुरेसा नसेल तर प्रथम विमा सुरक्षितता वाढवणे महत्त्वाचे ठरते. शासनाच्यावतीने अत्यल्प खर्चात विमा संरक्षण देणाऱ्या विविध योजना असून मागासवर्गीय व गरीब कुटुंबास अपघात, आजारपण, मृत्यू अशा संकटापासून संरक्षण दिले जाते. केवळ रु. 12 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा योजना 2 लाखाचे विमा संरक्षण देते तर आभा  कार्ड (Aँप्A) अंतर्गत 5 लाखाचा विमा दिला जातो.

विम्याच्याबाबत योग्य सल्ला घेऊनच त्याबाबत निर्णय घ्यावा. आता दुसरी महत्त्वाची आवश्यक जबाबदारी ही आपल्या पेन्शनची तरतूद करण्याची आहे. वृद्धत्व हे अपरिहार्य असून या काळात उत्पन्न घटते किंवा थांबते पण खर्च होत असतात. नियमित खर्चासोबत आरोग्यावरील खर्चातही वाढ होते. सर्व स्तरातील घटकांना पेन्शन उपलब्ध व्हावी यासाठी अटलपेन्शन योजना व नॅशनल पेन्शन योजना (ऱ्झ्ए) शासनाने उपलब्ध केली असून यामध्ये सहभागी होणे ऐच्छिक असले तरी ही बाब न स्वीकारणारे नंतर मोठ्या अडचणीत येऊ शकतात. आपणास किती पेन्शन हवी त्यानुसार आपण पेन्शनसाठी हप्ते भरू शकतो. विमा आणि पेन्शन या दोन प्राथमिक व आवश्यक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता आपण योग्य गुंतवणूक साधन कसे निवडावे व अर्थपूर्ण समृद्ध जीवनाचा मार्ग कसा निवडावा हे पाहू.

गुंतवणूक हवी पण गुंता नको

आपल्या बचतीस योग्य प्रकारच्या गुंतवणूक साधनात रुपांतरित केल्यानेच त्याचे खरे लाभ मिळतात. याबाबत अनेकांच्या मनातील भय व अवास्तव लोभ यातून गुंतवणुकीचा गुंता झालेला दिसतो. पूर्व निश्चित उद्दिष्टानुसार, कालबद्ध गुंतवणूक हेच मुख्य गमक यशस्वी वित्त नियोजनाचे आहे. याकरिता प्रथम सुरक्षितता, रोखता व परतावा या तिन्ही बाबी एकाचवेळी साध्य करणारे गुंतवणूक साधन हेच उत्तम गुंतवणूक साधन असते. परंतु अनेकदा यापैकी एखादे तत्व केलेल्या गुंतवणुकीत दिसत नसेल तर ती गुंतवणूक मालमत्ता न ठरता विषमता (ऊर्देग्म् Assाt) ठरते. बँकेतील तसेच पोस्ट ऑफिसमधील ठेव योजना सुरक्षित तसेच रोखता असणाऱ्या असल्या तरी त्यातून मिळणारा वास्तव परतावा अत्यल्प आहे. अनेकदा ठेवीवरील व्याजदर फक्त लक्षात घेतला जातो. पण हा परतावा महागाईच्या प्रमाणात वास्तव स्वरुपात घटतो याकडे दुर्लक्ष होते. जसे व्याजदर 7 टक्के असेल व महागाईदर 8 टक्के असेल तर वास्तव परतावा उणे 1 टक्के होतो! यात पुन्हा व्याज उत्पन्न कर प्राप्त असल्याने कर पश्चात परतावा आणखी कमी होतो. यासाठी गुंतवणुकीवरील वास्तव परतावा तपासणे महत्त्वाचे ठरते. दुसऱ्या बाजुला अधिक परताव्याच्या अपेक्षेने प्लॉट, जमीन, फ्लॅट, असुरक्षित गुंतवणुकीत फसणारे अनेकजण आजुबाजुला दिसतात. यात रोखता व सुरक्षितता दोन्ही बाबी संशयास्पद  राहतात.

(पूर्वार्ध)

(उत्तरार्ध)

गुंतवणुकीबाबत नेहमी जोखीम समजून घेणे व जोखीम व्यवस्थापन करणे हेही फार महत्त्वाचे असते. जोखीममुक्त अशी कोणतीही गुंतवणूक असत नाही. त्यामुळे खात्रीपूर्वक उच्च परतावा देणाऱ्या सर्व योजना या फसव्या असतात हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आपण किती जोखीम घ्यायला तयार आहोत यावरूनच गुंतवणूक साधन निवडावे. साधारणपणे आपले वय 100मधून वजा केले तर येणारा अंक जोखीम किती प्रमाणात घ्यावी हे स्पष्ट करतो. उदा. 25 वर्षाच्या युवकाने 75 टक्के उत्पन्न जोखीम असणाऱ्या साधनात तर 60 वर्षाच्या व्यक्तीने 40 टक्के उत्पन्न जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीत करणे योग्य ठरते. अर्थात हा ढोबळ नियम असून व्यक्तिगत आवड, जबाबदारी प्रमाण यावरही जोखीम प्रमाण ठरते.

गुंतवणूक योग्य प्रकारे करणे हे आपल्या पैशाला कामाला लावणे, गतिमान करण्याचे सूत्र आहे. त्यासाठी रक्कम कमी असली तरी दीर्घ कालखंडात चक्रवाढ पद्धतीने त्यात मोठी वाढ होते. त्यामुळेच चक्रवाढ तत्वास आईन्स्टाईन यानी आठवे आश्चर्य मानले आहे. आपणही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टासाठी अल्पकालीन गुंतवणूक साधन निवडले तर नुकसान होते. पेन्शनसाठीची गुंतवणूक बचत खात्यात ठेवणे हे शहाणपणाचे ठरत नाही. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासास आपण  वेगवान वाहन निवडतो तसेच गुंतवणुकीबाबतही ठरते. परंतु मुळातच ध्येय केंद्रित किंवा उद्दिष्ट निश्चित गुंतवणूक करणारेच फार कमी असल्याने त्यांचे नुकसान मोठे झालेले असते.

गुंतवणूक संवाद हा अलीकडच्या काळातील महत्त्वाचा घटक बनत असून आपल्या पश्चात वारस नोंद करणे, सर्व गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे, घरातील जबाबदार व्यक्तीस त्याची पूर्ण कल्पना देणे याबाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सध्या विविध वित्तसंस्थांकडे 86000 कोटी रुपये बेवारस पडून आहेत ते यामुळेच! निदान आपली गुंतवणूक त्यामध्ये जाणार नाही, याची काळजी घेणे उचित ठरेल. गुंतवणूक संवादाचा दुसरा भाग हा गुंतवणुकीचे दर सहा महिन्याने अथवा वर्षातून एकदा पुनरावलोकन करणे व गरजेनुसार गुंतवणूक रचना (पोर्ट फोलियो) बदलणे आवश्यक असते. विशेषत: शेअर्स, म्युच्युअल फंड याबाबत हे अधिक खरे आहे.

गुंतवणुकीचे बदलते क्षितीज

गुंतवणूक साधने वास्तव व वित्तीय अशा दोन प्रमुख गटात विभागल्या जातात.  फ्लॅट, जमीन, घरे, सोने ही सर्व वास्तव गुंतवणुकीचे प्रकार असून मुदत बंद ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स या वित्तीय गुंतवणुकी आहेत. अद्यापी वित्तीय गुंतवणुकीचे प्रमाण अल्प असून गुंतवणुकीचे बदलते क्षितिज किंवा नव्या संधी लक्षात घेणे आवश्यक आहे. शेअर बाजार व म्युच्युअल फंडातील परतावा दीर्घ कालखंडाच्या निकषावर 15 ते 16 टक्के इतका उत्तम असूनही फक्त 7 टक्के भारतीय याचा वापर  करतात. शेअर बाजार, जुगार समजणारे व त्याकडे दुर्लक्ष करणारे खरे नुकसान प्राप्त करणारे ठरतात. सध्या हा कल बदलत असून म्युच्युअल फंडातून दरमहा 18000 कोटीची गुंतवणूक होत असून हा सकारात्मक बदल भांडवल बाजार स्थिर करण्यास मदतकारक ठरतो आहे. वित्तीय बाजारात सुरक्षितता व पारदर्शी व्यवहार महत्त्वाचे असून त्यासाठी देशाच्या पातळीवर सेबी  एाम्ल्rग्tगे aह् xिंम्प्aहा ँद् द घ्ह्ग्a  म्हणजे भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ कार्यरत असून गुंतवणूकदारांना साक्षर करणे, त्यांचे संरक्षण करणे व सुलभता वाढवणे यासाठी प्रयत्नशील आहे. आर्थिक सल्लागार प्रशिक्षित असावेत. यासाठी नियम तयार केले असून नोंदणीकृत नसणारे वित्त सल्लागार दंडणीय आहेत. जर गुंतवणुकदाराची फसवणूक झाली तर तक्रार निवारण्यासाठी स्कोअर (एम्दा) प्रणाली उपलब्ध असून त्याचा आपण वापर करू शकतो. केवळ पैसे मिळवून चालणार नाही तर मिळवलेला पैसा सांभाळणे, वाढवणे महत्त्वाचे असून त्यासाठी नव्या तंत्राचा, साधनाचा वापर करून समृद्धीची, स्थैर्याची अर्थगुढी या नव्या वित्तवर्षात उभी करू व आपण त्याच्यावर लक्ष ठेवू!

- प्रा. विजय ककडे

Advertisement
Tags :

.