राजस्थानात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त
सहा आरोपींना अटक : जोधपूर ग्रामीण पोलिसांसह गुजरात एटीएसची संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था/ जोधपूर
जोधपूर ग्रामीण पोलीस आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे राजस्थानातील शेरगढ पोलीस स्टेशन हद्दीतील सोइंत्रा गावात ड्रग्ज तस्करीविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली. पथकाने गावातील एका कारखान्यावर छापा टाकत एमडी ड्रग्ज बनवताना आरोपींना रंगेहाथ पकडले. कारखान्यातून रसायनांनी भरलेले अनेक कॅन जप्त करण्यात आले असून त्यामध्ये अंदाजे 2 कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज असल्याचा संशय आहे. हा साठा प्रतापगढमधील तस्करांना पुरवण्यासाठी तयार करण्यात येत होता अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
राजस्थानमधील जोधपूर जिह्यातील पोलिसांना या कारवाईच्या माध्यमातून एक मोठे यश मिळवले आहे. शेरगढ परिसरातील सोइंत्रा गावात सोमवारी सकाळी झालेल्या या कारवाईत अनेक संशयितांना अटक करतानाच मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठाही जप्त करण्यात आला. ही टोळी राजस्थान आणि गुजरातला ड्रग्ज पुरवत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सीक्रेट लॅबचा शोध आणि जप्ती
पोलीस पथकाने सोइंत्रा गावातील एका ट्यूबवेलवर छापा टाकत रसायनांनी भरलेले पाच ते सहा कॅन जप्त केले. या कॅनचा वापर एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी केला जात असे. आरोपी रात्रीच्या अंधारात येऊन ड्रग्ज तयार करत असत. त्यानंतर पहाटेच्या आधी निघून जात होते. या टोळीचे सर्व काम रात्रीच्यावेळेस चालत होते. छाप्यादरम्यान प्रयोगशाळेतून ड्रग्ज बनवण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले. डीएसटी आणि एफएसएल पथकांनी रासायनिक नमुने गोळा केले आहेत. जोधपूर ग्रामीण एसपी नारायण तोगास यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली आणि तपास केला. हे संपूर्ण प्रकरण गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासाशी जोडलेले आहे. हे नेटवर्क गुजरातमधील वापीशी जोडलेले आहे. नुकतेच तिथे एका ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकून मोनू ओझा नामक तस्कराला अटक केल्यानंतर या टोळीचा सुगावा लागला होता. त्याच्या फोन कॉल डिटेल्सवरून शेरगडचे लोकेशन उघड झाले. या सुगाव्यावर काम करताना, गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि जोधपूर पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला. ही टोळी दोन्ही राज्यांमध्ये कार्यरत होती.