मॅकस्वीनी, एडवर्ड्स यांची अर्धशतके
नाथन मॅकस्वीनी : 74 धावा
► वृत्तसंस्था / लखनौ
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाविरुद्ध खेळताना पहिल्या डावात 9 बाद 350 धावा जमविल्या. कर्णधार नाथन मॅकस्वीनी आणि जॅक एडवर्ड्स यांनी शानदार अर्धशतके झळकविली तर भारत अ संघातील मानव सुतारने 93 धावांत 5 गडी बाद केले.
या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. चार दिवसांच्या या दुसऱ्या कसोटीत भारत अ ने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा केलावे केवळ 9 धावांवर बाद झाल्यानंतर कोन्स्टास आणि मॅकस्वीनी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 86 धावांची भागिदारी केली. कोन्स्टासने 7 चौकारांसह 49 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर मॅकस्वीनी आणि ऑलिव्हर पीके यांनी तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली. पीकेने 6 चौकारांसह 29 धावा केल्या. कोनोलीला खाते उघडता आले नाही. फिलीपने 5 चौकारांसह 39 धावांचे योगदान दिले. मॅकस्वीनी आणि एडवर्ड्स यांनी पाचव्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. मॅकस्वीनीने 162 चेंडूत 10 चौकारांसह 74 धावा झळकविल्या तर एडवर्ड्सने 78 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 88 धावांचे योगदान दिले. मर्फीने 5 चौकारांसह नाबाद 29 तर सदरलँडने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. 84 षटकात ऑस्ट्रेलिया अ ने 9 बाद 350 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे मानव सुतारने 93 धावांत 5 तर ब्रारने 71 धावांत 2 तसेच मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया अ प. डाव 84 षटकात 9 बाद 350 (एडवर्ड्स 88, मॅकस्वीनी 74, कोन्स्टास 49, फिलीप 39, मर्फी खेळत आहे 29, सदरलँड 10, मानव सुतार 5-93, ब्रार 2-71, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 1 बळी)