गोकाक तालुक्यातील एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू
कारवार : येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी रात्री काणकोण (गोवा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माशे येथील अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य एक एमबीबीएस विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आदर्श पुजारी (वय 23) असे आहे आणि जखमी विद्यार्थ्यांचे नाव रौनक चावला असे आहे. मृत आदर्श पुजारी बेळगाव जिल्ह्dयाच्या गोकाक तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले.
या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, आदर्श पुजारी आणि रौनक चावला हे एमबीबीएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मंगळवारी रात्री जेवणासाठी जीए 49 ईसी 2998 या क्रमांकाच्या रॉयल इनफिल्ड या मोटारसायकलवरुन काणकोण (गोवा) येथे गेले होते. जेवण आटोपून ते परत कारवारला निघाले असता माशे येथे एक म्हैस मोटारसायकलीसमोर आली. त्यामुळे मोटारसायकल स्कीड होवून ते रस्त्यावर पडले आणि गंभीररित्या जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी काणकोण येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले. तथापि, डॉक्टरांनी आदर्श पुजारीला मृत घोषित केले. जखमी रौनक चावला याला उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद काणकोण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.